क्रिकेट विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अंडर-19 टीममध्ये निवड झालेल्या 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने आत्महत्या केली आहे. B विशेष म्हणजे, क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी करण्याची संधी तिच्यासमोर असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांसह क्रीडाप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. नंदिनी असं या खेळाडूचं नाव आहे. तेलंगणातील विकाराबादमधील मधू कॉलनीमध्ये ही घटना घडली. नंदिनीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
दोन तरुणांच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल?
मृत नंदिनी ही मूळची विकाराबाद जिल्ह्यातील यलाल मंडलातील संगयापल्ली गावची रहिवासी होती. ती विकाराबादच्या मधु कॉलनीत आपल्या आजीकडे राहून शिक्षण घेण्यासोबतच क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होती. तिच्या मृत्यूनंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने केली.
नंदिनी ही विकाराबाद जिल्ह्यातील सांगयापल्ली गावची रहिवासी होती. ती विकाराबादमध्ये आपल्या आजीकडे राहून शिक्षण घेत होती. यासोबतच ती क्रिकेटचं प्रशिक्षणही घेत होती. काही दिवसांपूर्वीच तिची BCCIच्या अंडर-19 टीममध्ये निवड झाली होती. या निवडीमुळे नंदिनीच्या जिल्ह्याला एक नवी ओळख मिळाली होती. तसंच तिच्या कुटुंबीयांनाही तिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. क्रिकेटमध्ये ती चांगलं करिअर करेल, अशी आशा सर्वांना होती.
प्रेमाच्या नावाखाली नंदिनीचा पाठलाग? नंदिनीच्या कुटुंबीयांनी दोन तरुणांवर गंभीर आरोप केले आहेत. अनिल आणि कृष्णा नावाचे दोन तरुण नंदिनीला वारंवार त्रास देत होते, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, अनिल गेल्या काही दिवसांपासून प्रेमाच्या नावाखाली नंदिनीचा सतत पाठलाग करत होता. कृष्णा त्याला मदत करत असल्याचाही आरोप आहे. या त्रासामुळेच नंदिनीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
या घटनेची माहिती सकाळी 9 वाजता पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच विकाराबाद पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. विकाराबादचे सर्कल इन्स्पेक्टर रघू यांनी याबाबत माहिती दिली. तपासादरम्यान नंदिनीने घराच्या छताला असलेल्या पंख्याला लटकून आत्महत्या केल्याचं समोर आलं. नंदिनीच्या कुटुंबीयांनी दोन तरुणांविरोधात त्रास दिल्याची तक्रार केली आहे, असंही इन्स्पेक्टर रघू यांनी सांगितलं. पोलिसांनी नंदिनीचा मोबाईल फोन ताब्यात घेतला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखल नंदिनीच्या मृत्यूनंतर तिचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. दोन्ही आरोपींना तातडीने अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. नंदिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान सर्कल इन्स्पेक्टर रघू यांनी पालकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं. त्यांच्याशी संवाद साधावा आणि त्यांना शक्य तितका भावनिक आधार द्यावा, असं त्यांनी सांगितलं.