अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने व्हिसासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीयांना थेट धक्का बसणार आहे. कारण या निर्णयाचा थेट परिणाम भारतीय विद्यार्थी आणि कामगारांवर होणार आहे. ट्रम्प प्रशासनाने जगभरातील अमेरिकी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमधील इमिग्रंट व्हिसा अपॉइंटमेंट्स स्थगित केल्या आहेत. या व्हिसा अपॉइंटमेंट्सचे वेळापत्रक बदलले आहे.
प्रशासनाकडून अंमलात आणल्या जाणाऱ्या कठोर स्थलांतर धोरणांच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, जगभरातील अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये एक जागतिक प्रशिक्षण सुरू करण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी सोय व्हावी, याकरिता व्हिसा सेवेसाठी भेटीतील वेळांमध्ये काही बदल केले आहेत. आता अमेरिकेत जाणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. अमेरिकेतून व्यक्तींना हद्दपार करण्यासाठी आणि स्थलांतर धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी थेट आता आक्रमकपणे मोहिम राबवली जात आहे. ग्रीन कार्ड रद्द, व्हिसा रद्द अशा अनेक गोष्टींचा यात समावेश आहे.
अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, या धोरणामुळे राष्ट्रीय सुरक्षा अधिक चांगली करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, धोरणात्मक कायदेशीर अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. H-1B व्हिसाच्याही नियमात अनेक बदल करण्यात आलीत. यासोबतच मोठे शुल्क आकारण्यात आलेत. ज्यामुळे H-1B व्हिसावर अमेरिकेत जाणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.
त्यातच आता मुलाखती स्थगित करण्यात आल्यात. H-1B व्हिसासोबतच अनेक नियमात त्यांनी बदल केले आहेत. B1 व्हिसा सामान्यतः व्यावसायिक दौऱ्यांसाठी दिले जातात. B2 व्हिसा पर्यटन, कुटुंबातील व्यक्तींची भेट किंवा वैद्यकीय उपचारांसाठी दिला जातो. या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना हे सिद्ध करावे लागते की, त्यांचा अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याचा कोणताही इरादा नाही आणि ते पुन्हा त्यांच्या देशात परततील. मात्र, आता सतत अमेरिकेकडून व्हिसाच्या नियमात बदल केले जात आहेत.