रॅपिडोच्या बाईक टॅक्सी सेवेमुळे राज्यातील रिक्षाचालकांमध्ये नाराजी वाढली असून, या सेवेला विरोध करण्यासाठी रिक्षा संघटनांनी पुन्हा संपाची हाक दिली आहे. रॅपिडोमुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप संघटनांकडून केला जात आहे. दरम्यान, या संपाच्या इशाऱ्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रिक्षाचालकांच्या मागण्यांवर त्यांनी नेमकी काय भूमिका मांडली? राज्यात पुन्हा रिक्षांची चाकं थांबणार का? जाणून घेऊया सविस्तर...
मागील अनेक दिवसांपासून सीएनजीच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे दरवाढीसहीत रॅपिडोवर बंदी घालण्याची मागणी रिक्षा चालकांकडून केली जात आहे. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांनी पुन्हा 1 डिसेंबर रोजी संपाची हाक दिली आहे. रिक्षा चालकांच्या मागणीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पहिली प्रतिक्रियाा दिली आहे. रिक्षा चालकांच्या मागण्यांवर तोडगा काढला जाईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सरनाईक म्हणले, ‘रिक्षाचालकांच्या संपाच्या संदर्भात काही प्रतिनिधी मला भेटण्यासाठी येणार आहेत.एक डिसेंबरपासून होणारा प्रस्तावित संप होणार नाही, असा मला विश्वास आहे. रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत परिवहन मंत्री म्हणून माझी भूमिका सकारात्मक आहे. त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना परिवहन आयुक्तांना देण्यात येणार आहेत. रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर चर्चेच्या माध्यमातून योग्य तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असेल’.