पोलीस ठाण्यात रक्तरंजित थरार! चाकू हल्ल्यात ५ पोलीस कर्मचारी जखमी
पोलीस ठाण्यात रक्तरंजित थरार! चाकू हल्ल्यात ५ पोलीस कर्मचारी जखमी
img
Nandini khandare More

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या दिल्लीतील पोलीस ठाण्यातच पोलिसांवर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादाच्या तक्रारीसंदर्भात चौकशीसाठी बोलावलेल्या एका व्यक्तीने अचानक पोलिसांवर हल्ला केला. या घटनेत पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुराणी दिल्ली येथील जामा मशीद पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान एका व्यक्तीने पोलिसांवर चाकूने हल्ला केला. यात पाच पोलीस कर्मचारी जखमी झालेत. आरोपी नबीलचा पाठलाग करत पोलिसांनी चितली कबर परिसरातून अटक केलीय. पाठलाग करताना पोलिसांना गोळी झाडावी लागली.

आरोपीची ओळख नबील अशी पटलीय. चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी घटना स्थळावरून पळून गेला. पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेली एक दुचाकी घेत त्याने तेथून पोबारा केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला चितली कबर परिसरात घेरले. तिथे त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; त्यावेळी पोलिसांनी आपल्या संरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास नबीलला जामा मशीद पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. हे बोलावणे त्याच्या आई आणि बहिणीशी संबंधित कौटुंबिक वादाच्या तक्रारीच्या संदर्भात होते. पोलीस ठाण्यात अधिकारी त्याच्याशी चर्चा करत असताना, त्याने अचानक चाकू काढून पोलिसांवर हल्ला केला. त्याने अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर वार केले, ज्यात पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार मिळाल्यानंतर, त्यांची प्रकृती लक्षात घेता, त्यांना अधिक चांगल्या वैद्यकीय उपचारांसाठी सर गंगाराम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, हल्ला केल्यानंतर आरोपी पोलीस ठाण्यातून पळून गेला. पळून जाण्यासाठी त्याने वाटेत एक दुचाकी वाहन बळकावले. या घटनेची माहिती मिळताच मध्य जिल्ह्याच्या 'ऑपरेशन्स युनिट'चे पथक सक्रिय झाले आणि त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला.

पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करत 'चितली कब्र' परिसरात त्याला पकडलं. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला. यावर स्वसंरक्षणासाठी आणि त्याला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पथकाने गोळीबार केला आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेतले.
इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group