अनैतिक संबंधांच्या संशयातून एका तरुणाची दिवसाढवळ्या हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात तरुणाच्या प्रेयसीच्या मुलावर संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, हत्येमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून एका ४० वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी ११:४० वाजण्याच्या सुमारास सोनई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात, शिंगणापूर कमान्याजवळ ही थरारक घटना घडली.
याप्रकरणी सोनई पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला आपल्या ताब्यात घेतलं आहे. रावसाहेब मच्छिंद्र पंडित (वय ४०, रा. धनगर गल्ली, सोनई) असे खून झालेल्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. रावसाहेब याचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध सुरू होते. याची माहिती महिलेच्या मुलाला समजली. यावरून अनेकदा वाद झाला होता. हे अनैतिक संबंध तोडावेत, असं महिलेच्या मुलाने सांगितलं होतं. मात्र तरीही रावसाहेब याने ऐकलं नाही, यातूनच हे हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नेमकी घटना कशी घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रावसाहेब पंडित हा मालवाहतूक गाडी चालवून शेतमजुरांची ने-आण करण्याचं काम करत असे. दरम्यानच्या काळात त्याची ओळख एका महिलेशी झाली होती, ज्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. संबंधित महिलेच्या मुलाने वारंवार समजावून सांगूनही त्यांच्यातील हे अनैतिक संबंध सुरूच होते. शुक्रवारी (दि. १३) सकाळी ११:४० वाजता रावसाहेब पंडित हे डॉ. आंबेडकर चौकात आपल्या गाडीजवळ उभे असताना, संबंधित महिलेचा मुलगा व त्याचा एक अनोळखी साथीदार दुचाकीवरून तिथे आले. अनैतिक संबंधाच्या कारणावरून त्यांनी रावसाहेब पंडित याच्यावर धारदार हत्याराने सपासप वार केले. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रावसाहेब पंडित यांना त्यांच्या चुलतभाऊ कैलास मंजाबापू पंडित यांनी तातडीने प्रथम सोनई येथील रुग्णालयात आणि तिथून पुढील उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. या प्रकरणी मृत रावसाहेब यांच्या लहान भाऊ दीपक पंडित (वय ३६) यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला तत्काळ ताब्यात घेतलं असून, या प्रकरणाचा पुढील कसून तपास सुरू आहे.