नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- रिक्षाचा नंबर लावण्यावरून त्र्यंबक नाका चौकात पिनॅकल मॉल जवळ चार-पाच जणांच्या टोळक्याने एका रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला करून फरार झाले. फरार झालेल्या हल्लेखोरांपैकी दोघांना गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अवघ्या काही तासात अटक केली. पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत.
याबाबत माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी पिनॅकल मॉलजवळ प्रवाशी भरण्यावरून रिक्षाचालकांमध्ये वाद झाला होता. त्यात चार-पाच आरोपींच्या टोळक्याने रिक्षात प्रेमसिंग हिरे याच्यावर कोयत्याने हल्ला केला होता. यादरम्यान गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील आडके आणि अंमलदार गुरू गांगुर्डे याच परिसरातून जात होते. त्यांनी तातडीने या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, हवालदार चव्हाण यांच्या मदतीने लगेचच दोघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले. तर जखमी रिक्षाचालक प्रेमसिंग हिरे यास जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.
याप्रकरणी पोलिसांनी पवन गोविंदा पाटील (वय २५, रा. रामदास गार्डनच्या मागे, शरणपूररोड) आणि राहुल लहू सोनवणे (वय २५, रा. केशव पोरजे यांचे निवासस्थान, वडनेर दुमाला, देवळाली कॅम्प रोड) या दोघांना ताब्यात घेतले असून, याप्रकरणी फिर्यादी दीपक संजय पाटील यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता व इतर कलमान्वये या दोघा आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवन पाटील आणि राहुल सोनवणे, जगदीश सोनवणे, अरूण कांबळे आदींनी प्रेमसिंग हिरे यांस मारहाण केली. मुख्यत: पवन पाटील आणि अरूण कांबळे यांचे जखमी प्रेमसिंग हिरे याच्यासमवेत रिक्षा प्रवाशी भरण्यावरून वारंवार वाद होत असत. त्यातून हा हल्ला करण्यात आला. मात्र गुंडविरोधी पथकाने अवघ्या काही तासात दोन आरोपींना अटक केली. काही आरोपी अद्यापीही फरार आहेत.