बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे! पुढील काही दिवसांत बँकांना सुट्ट्या असल्यामुळे ग्राहकांनी बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांचे वेळापत्रक तपासणे आवश्यक आहे. कोणत्या दिवशी बँका बंद राहणार? महाराष्ट्रातील तुमच्या शहरात बँकांना सुट्टी आहे का? तसेच या काळात ATM, UPI आणि ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहणार का? जाणून घेऊया बँकांच्या सुट्ट्यांबाबतची संपूर्ण माहिती.
२४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान काही शहरांमध्ये बँकांच्या शाखा सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे चेक जमा करणं, पैसे काढणं किंवा इतर शाखेशी संबंधित कामांचं नियोजन करताना ग्राहकांना सुट्ट्यांची माहिती जाणून घ्यावी.
२४ ऑक्टोबरला बँका बंद का? भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमानुसार, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. त्यामुळे २४ ऑक्टोबर हा चौथा शनिवार असल्यामुळे बँकांच्या शाखा बंद राहतील. त्यानंतर २५ ऑक्टोबरला रविवार असल्यामुळे देशभरातल्या बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
या शहरांमध्ये सलग तीन दिवस बँकां बंद २६ ऑक्टोबर रोजी काही शहरांमध्ये स्थानिक सण आणि विशेष दिवसांमुळे बँकांच्या शाखांना सुट्टी असेल. अगरतळा, बेंगळुरू, चंदीगड, जम्मू, शिमला आणि श्रीनगर या शहरांचा त्यात समावेश आहे. या दिवशी लक्ष्मीपूजा, जम्मू-काश्मीर विलीनीकरण दिन आणि महर्षि वाल्मीकी जयंती यांसारख्या स्थानिक सुट्ट्यांमुळे संबंधित भागातल्या बँकांचं कामकाज बंद राहू शकते. मात्र, सुट्टीचं कारण आणि लागू असलेली तारीख शहरानुसार वेगवेगळी असू शकते. त्यामुळे ग्राहकांनी RBI च्या अधिकृत बँक सुट्टीच्या यादीतून आपल्या शहराची माहिती तपासावी.
बँका बंद असताना कोणत्या सेवा सुरू राहतील? बँकांच्या शाखांना सुट्टी असली, तरी बऱ्याच डिजिटल बँकिंग सेवा सुरू राहतात. ग्राहक पुढच्या सेवांचा वापर करू शकतात. UPI व्यवहार - ऑनलाइन पैसे पाठवणे आणि स्वीकारणे. मोबाइल व इंटरनेट बँकिंग - खात्यातील शिल्लक तपासणे आणि पात्र ऑनलाइन व्यवहार करणे. ATM सेवा - उपलब्धतेनुसार पैसे काढणे आणि इतर सुविधांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. पण, चेक क्लिअरन्स, शाखेतून होणारी कामं आणि काही विशिष्ट व्यवहारांना सुट्ट्यांमुळे उशीर होऊ शकतो. त्यामुळे बँकेत जाण्याआधी सुट्ट्यांचं वेळापत्रक तपासा आणि शक्य असेल तर महत्त्वाची कामं आधीच पूर्ण करा. तुमच्या शहरातल्या बँकेची अचूक सुट्टी जाणून घेण्यासाठी RBI ची अधिकृत माहिती पाहणं सर्वात योग्य ठरेल.