देशात सध्या महागाईने डोके वर काढले असून पेट्रोल-डिझेल तर कधी एलपीजीच्या वाढत्या किंमतींनी नागरिकांचा खिसा कापला. आता सीएनजी महागला आहे. गेल्या चार महिन्यात सीएनजी जवळपास 10 रुपयांनी महागला. तर दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीची किंमत 3.89 रुपयांनी वाढली. इंद्रप्रस्थ कंपनीच्या सीएनजीचेच दर वधारले आहेत. तर इतर तीन कंपन्यांच्या सीएनजीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईसह महाराष्ट्रात दरवाढीची कोणतीही माहिती समोर आली नाही. पण राज्यातही किंमत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
15 मे रोजी सीएनजीचा भाव वधारला. तर IGL ने 2 रुपयांच्या दरवाढीची घोषणा केली. 17 मे, 23 मे आणि 26 मे रोजी आयजीएलने हळूहळू सीएनजी महाग केला. 17 ते 26 मे दरम्यान म्हणजे 10 दिवसात सीएनजीचा भाव 6 रुपयांनी वाढला.
आता पुन्हा एकदा झटका
मे महिन्यानंतर आयजीएलने आता 29 ऑगस्ट रोजी सीएनजीच्या भावात वाढ केली आहे. आज दिल्लीसह एनसीआरमध्ये सीएनजीचा भाव 3 रुपये 89 पैशांनी वाढला. एकाच वर्षात सीएनजीत मोठी वाढ झाली आहे. आता दिल्ली एनसीआरमध्ये एक किलो सीएनजीची किंमत 86 रुपये 98 पैसे इतकी झाली आहे. तर चार महिन्याचा विचार करता एकूण 9.89 रुपयांची वाढ जाली आहे.
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडच्या सीएनजी दरात वाढ
दिल्ली आणि आसपासच्या परिसरात (दिल्ली-NCR) इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (IGL) सीएनजीच्या (CNG) दरात थेट 3.89 रुपये प्रति किलो एवढी वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलएनजीचे भाव वाढल्यामुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे. नव्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत आता सीएनजीचा दर 86.98 रुपये प्रति किलो झाला आहे. तर नोएडा आणि गाझियाबादमध्ये हा दर 95.59 रुपये, गुरुग्राममध्ये 92.01 रुपये आणि मेरठमध्ये 95.47 रुपये प्रति किलो झाला आहे. वेगवेगळ्या राज्यांनुसार कर (VAT) वेगवेगळा असल्यामुळे शहरांनुसार दरांमध्ये थोडा फरक दिसून येतो.