भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. या संघात काही महत्त्वाच्या खेळाडूंच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाची चिंता वाढण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडने यावेळी नेमकी कोणती रणनीती आखली आहे? कोणत्या खेळाडूंच्या एन्ट्रीमुळे टीम इंडियासमोर नवं आव्हान उभं राहणार आहे? जाणून घेऊया सविस्तर…
भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी न्यूझीलंडने त्यांचा १४ सदस्यीय तगडा संघ जाहीर केला. दुखापतीमुळे वन डे मालिकेला मुकलेले रचीन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
रवींद्रला पाच ट्वेंटी-२० आणि वन डे मालिकेलाही खांदा निखळल्यामुळे मुकावे लागले होते. तेच ईडन पार्कवर सराव करताना वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीसोबत झालेल्या धडकेनंतर कॉनवेला वन डे मालिकेला मुकावे लागले होते. क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीतून सावरत असलेल्या यष्टीरक्षक टॉम ब्लंडेलचाही संघात समावेश आहे.
इंग्लंडमध्ये जाऊन २-१ अशी कसोटी मालिका जिंकणाऱ्या संघातील बऱ्याच खेळाडूंना न्यूझीलंडने कायम राखले आहे. निवृत्तीमुळे केन विलियम्सनचा या संघात समावेश नाही, वेगवान गोलंदाज विल ओ'रुर्क, बेन सियर्स व झॅक फॉल्क्स हेही या संघात नाहीत. विलियम्सनने इंग्लंड दौऱ्याच्या मध्यातच निवृत्ती घेतली, तर सियर्स आणि फॉल्क्स जखमी आहेत. संघाचा एक महत्त्वाचा सदस्य असलेल्या ओ'रूर्कला, पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या चार सामन्यांच्या दौऱ्यापूर्वी कामाचा ताण व्यवस्थापित करण्याच्या कार्यक्रमांतर्गत विश्रांती देण्यात आली आहे.
भारताने २० वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती आणि शुभमन गिलच्या संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी या दोन्ही कसोटी जिंकणे गरजेचे आहे.
New Zealand Test squad v India - टॉम लॅथम ( कर्णधार), टॉम ब्लंडल, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, नॅथन स्मिथ, ब्लेअर टिकनर, विल यंग.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघ ५१.५२ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडने भारत दौऱ्यावर ३-० अशी कसोटी मालिका जिंकली होती आणि त्याचा वचपा काढण्याची भारताला संधी आहे. भारताने इंग्लंड दौऱ्यावर मालिका बरोबरीत राखली होती आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर हार झाली. त्यानंतर वेस्ट इंडिज ( २-०) आणि श्रीलंका ( १-०) यांच्याविरुद्ध भारतीय संघाने विजय मिळवले. आता भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या दोन, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवणे गरजेचे आहे.