अहिल्यानगर जिल्ह्यातील एका देवस्थानात धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. देवस्थानाच्या बाथरूममध्ये एक साधू आणि महिला आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून संबंधित साधूवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला जात आहे. तसेच या प्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी येथे ही घटना घडली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री चैतन्य कानिफनाथ मंदिर देवस्थानमध्ये हा प्रकार घडला. देवस्थानाच्या बाथरूममध्ये एका तथाकथित साधूला नग्न अवस्थेत महिलेसोबत पकडण्यात आले. या घटनेमुळे मढी गावात एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी समाज माध्यमांना दिला.
हा साधू आणि ती महिला एकत्र गेले होते की त्या महिलेला त्याने बळजबरी बाथरूममध्ये नेले होते? याबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही. या प्रकरणी पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र देवस्थानच्या परिसरामध्ये हा प्रकार घडल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी याबाबत देवस्थानच्या ट्रस्टींना दोषी ठरवत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
एवढी मोठी घटना देवस्थानच्या परिसरात घडूनही देवस्थानचे ट्रस्टी तोंडाला पट्टी लावून बसले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी होऊन ट्रस्टींसह साधूवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच संजय मरकड यांनी केली आहे. या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले आहेत.