राज्यातून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळणार का, याकडे नागरिकांसह शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. भारतीय हवामान विभागाकडून हवामानाबाबत महत्त्वाचे अंदाज व्यक्त केले जात असताना, नेमक्या कोणत्या तारखेला आणि कोणत्या भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्यात सध्या दुष्काळाची स्थिती आहे. दुष्काळामुळे शेतकरी हवालदील झालाय. रबी हंगामाची पेरणी झालेली असून एखादा तरी परतीचा पाऊस व्हावा अशी आस शेतकरी लावून बसलाय. दुसरीकडे राज्यात 304 राज्यात दुष्काळ जाहीर झाल्याने सरकार शेतकरी, मजूर तसेच सामान्य नागरिकांना जमेल त्या मार्गाने मदत करत आहे. असे असतानाच राज्याला दिलासा देणारी एक माहिती समोर आली आहे. पुढच्या काही दिवसात म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तसा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) व्यक्त केलाय.
पावसाचा नेमका अंदाज काय?
आयएमडीच्या माहितीनुसार राज्यात सध्या पावसाला पोषक अशी स्थिती निर्माण होत आहे. बंगालच्य खाडीत दबावाचे नवे क्षेत्र तयार होत आहे. या वातावरणीय स्थितीमुळे बंगालच्या खाडीत 26 ऑक्टोबरनंतर चक्रिवादळाची स्थिती तयार होऊ शकते. त्यानंतर 27 ऑक्टोबरनंतर देशात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. आंध्र प्रदेशात 29 ते 29 ऑक्टोबरच्या काळात पाऊस होऊ शकतो. महाराष्ट्रातही ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
भारतात कुठे कुठे पाऊस होणार?
आयएमडीने पुढील चार आठवड्यांसाठी हवामानाचा अंदाज व्यक्त केलाय. या अंदाजानुसार दक्षिण भारतात काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो. पूर्व भारत, ईशान्य भारतात पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य भारतातील अनेक भागांत तसेच पूर्व उत्तर प्रदेशातही पाऊस पडू शकतो. पश्चिम बंगालमधील खोरे आणि ओडिशामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात रबी हंगामसाठी पाऊस गरजेचा
दरम्यान, राज्यात एकूण 53 लाख हेक्टर श्रेत्रापैकी फक्त 20 ते 25 लाख हेक्टर क्षेत्रातच रबी हंगामची पेरणी करण्यात आली आहे. त्यामुळे परतीचा पाऊस न झाल्यास पेरणी झालेल्या क्षेत्रातील पीकही हातातून जाऊ शकते. त्यामुळे एखादा चांगला पाऊस होणे गरजेचे आहे. असे असताना ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या मनात एक आशा जगृत झाली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.