नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक अंकाई किल्ल्यावर आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. संगमनेर येथून अंकाई किल्ला दर्शनासाठी आलेले अमित धोंडीभाऊ धुळगंड या भाविकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी संगमनेर येथून अंकाई किल्ला या ऐतिहासिक स्थळी काही भाविक पर्यटनासाठी आणि दर्शनासाठी आले होते. यादरम्यान अमित धुळगंड यांना अचानक तीव्र छातीत दुखू लागले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ही बाब लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत मदतीसाठी तातडीने धाव घेतली.
डोंगराच्या दुर्गम भागातून त्यांना सुखरूप खाली आणण्याचे शर्थीचे प्रयत्न ग्रामस्थांनी केले; मात्र डोंगरावरून खाली उतरत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली. ऐतिहासिक अंकाई किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या एका तरुण भाविकाचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्यामुळे संगमनेर आणि येवला परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करीत आहे