राहुलचं शतक, गिलची फटकेबाजी; न्यूझीलंडविरुद्ध भारताची भक्कम आघाडी!
राहुलचं शतक, गिलची फटकेबाजी; न्यूझीलंडविरुद्ध भारताची भक्कम आघाडी!
img
Nandini khandare More
वेलिंग्टन कसोटी सामन्यात टीम इंडियाने दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडविरुद्ध आपली स्थिती मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने ४ गड्यांच्या मोबदल्यात तब्बल ४८६ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडने पहिल्या डावात केलेल्या ३६८ धावांना प्रत्युत्तर देताना भारताने ११८ धावांची आघाडी घेतली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने ४ बाद ४८६ धावा उभारून सामन्यावर भक्कम पकड मिळवली आहे. भारताने न्यूझीलंडवर ११८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. सलामीवीर के.एल. राहुलने १३६ धावांची दमदार शतकी खेळी केली, तर कर्णधार शुभमन गिलचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले आणि तो ९८ धावांवर बाद झाला.

के.एल. राहुलने या खेळीदरम्यान कसोटी क्रिकेटमधील आपले १३ वे शतक पूर्ण केले. सलामीवीर म्हणून हे त्याचे १२ वे कसोटी शतक ठरले असून, यासह त्याने अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांच्या कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. दुसरीकडे, शुभमन गिल २०१४ नंतर न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी अर्धशतक झळकावणारा महेंद्रसिंग धोनीनंतरचा पहिला भारतीय कर्णधार ठरला. विशेष म्हणजे, न्यूझीलंडमध्ये खेळताना कोणत्याही पाहुण्या संघाच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी ८० पेक्षा अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारतीय संघाने  १ बाद १५९ या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. के.एल. राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर आक्रमण करत १६५ धावांची मोठी भागीदारी रचली आणि संघाला भक्कम स्थितीत नेले. देवदत्त पडिक्कल ८० धावांवर काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने के.एल. राहुलसोबत ९१ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. शतकी खेळीनंतर १३६ धावांवर नॅथन स्मिथने के.एल. राहुलला बाद करत ही जोडी फोडली.

दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या रिषभ पंतनेही आक्रमक फलंदाजी करत शुभमन गिलसोबत (Shubhman Gill) शतकी भागीदारी रचली आणि कसोटी कारकीर्दीतील आपले २२ वे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, दिवसाच्या शेवटच्या षटकात जेकब डफीच्या गोलंदाजीवर शुभमन गिल ९८ धावांवर त्रिफळाचीत झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रिषभ पंत ५५ धावांवर नाबाद होता, तर नाईट वॉचमन म्हणून बढती मिळालेला अंशुल कंबोज शून्यावर नाबाद परतला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group