तपोवन ते रामकुंड धर्मध्वजाची भव्य नगर परिक्रमा उत्साहात
तपोवन ते रामकुंड धर्मध्वजाची भव्य नगर परिक्रमा उत्साहात
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंगलमय पर्वाच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी तपोवन ते रामकुंड अशी सिंहस्थ कुंभमेळा महाध्वजाची भव्य परिक्रमा उत्साहात पार पडली. आज दि. 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार्‍या धर्मध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित या परिक्रमेत साधू-महंत, लोकप्रतिनिधी आणि हजारो भाविक सहभागी झाले. धार्मिक वातावरण, मंत्रोच्चार आणि जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
परिक्रमेला प्रारंभ होण्यापूर्वी तपोवन येथे धर्मध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले. मंत्रोच्चाराच्या गजरात धर्मध्वजाला पुष्प अर्पण करून साधू-महंतांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या वतीने परिक्रमेला प्रारंभ करण्यात आला. तपोवनातून निघालेली ही भव्य शोभायात्रा तपोवन कॉर्नर, काट्या मारुती चौक, देवी चौक, गणेशवाडी, नेहरू चौक, मेनरोड, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड मार्गे रामकुंड येथे पोहोचली. सर्वसाधारण पाच किलोमीटर अंतराची ही परिक्रमा यात्रा विविध धार्मिक जयघोष आणि भक्तिमय वातावरणात रामकुंड येथे पोहोचली. या परिक्रमेद्वारे सिंहस्थ कुंभमेळ्याचा धार्मिक आणि आध्यात्मिक संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

या सोहळ्यात श्री महंत ग्यानदास महाराज, तिलाद्वारा गाद्याचार्य मंगलपीठाधीश्‍वर श्री श्री 1008 माधवदासजी महाराज, जगद्गुरू श्रीमद् स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्यासह चार जगद्गुरूंसह विविध आखाड्यांचे साधू-महंत सहभागी झाले होते, तसेच पालकमंत्री गिरीश महाजन, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे प्रमुख विश्‍वस्त सतीश शुक्ल, अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, उपाध्यक्ष दिलीप शुक्ल, वैभव दीक्षित, प्रतीक शुक्ल व शेखर शुक्ल यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि भाविकांची उपस्थिती होती. शोभायात्रेमध्ये महाध्वजाचा रथ तसेच अमृतकुंभ रथ व रामरथ यासह विविध मठांचे महंत यांचे रथ आणि ग्यानदास महाराज, जगद्गुरू रामानंदाचार्य व नरेंद्रचार्य महाराज यांचे रथ सहभागी झाले होते. एक हजारपेक्षा अधिक स्वयंसेवकांनी पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागरण केले, तसेच नशामुक्ती पथनाट्य, रक्तदानाचे महत्त्व सांगणारे चित्ररथ, ढोल ताशाची पथके, लेझीम पथक, लाठी-काठी, ढाल- तलवार पथके, दांडपट्टा, मल्लखांब यासारख्या मर्दानी खेळाचे प्रदर्शनदेखील आखाड्यांच्या भक्तगणांनी केले.

शुक्रवारी परिक्रमा काढण्यात आलेल्या याच धर्मध्वजाचे उद्या दि. 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधिवत् ध्वजारोहण होणार आहे. त्यामुळे धर्मध्वज परिक्रमेने नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक सोहळ्यांना उत्साहात प्रारंभ झाला असून, या ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या ध्वजारोहण सोहळ्यात विक्रमी गर्दी होणार आहे. यावेळी ध्वजारोहणाच्या निमित्ताने सायंकाळी गोदावरी मातेची आरती होणार असून, या आरतीलादेखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहेत. सुमारे 6657 आदिवासी बंधूही आरतीत सहभागी होतील, तर व्यासपीठावर 13 आखाड्यांचे प्रमुख महंत, शंकराचार्य व चार जगद्गुरू उपस्थित राहणार आहेत. हा एक विश्‍वविक्रम होणार असून, राष्ट्रपतींबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्यासह मुख्यमंत्री आणि इतर मंत्रीदेखील आज होणार्‍या नाशिक व त्र्यंबकेश्‍वरमधील सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group