बिग बींचा ‘जलसा’ बंगला आणि दिलजीतचा कॉन्सर्ट उडवण्याची धमकी; मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
बिग बींचा ‘जलसा’ बंगला आणि दिलजीतचा कॉन्सर्ट उडवण्याची धमकी; मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
img
Nandini khandare More

मुंबईतून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याला आणि प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेत खळबळ उडाली आहे. एका धमकीच्या ई-मेलमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, संबंधित ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ही धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली असून  एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या महापौर कार्यालयासह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टचा उल्लेख या ई-मेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला टार्गेट करण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, मुंबईतील काही शाळांनाही धमकीचे ई-मेल पाठवण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे शहरातील सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

दिलजीत दोसांझच्या भारत दौऱ्याची सध्या चर्चा सुरू आहे. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे २७ नोव्हेंबर रोजी त्याचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात येणार आहे. मात्र, या कॉन्सर्टचा उल्लेख धमकीच्या ई-मेलमध्ये असल्याने आयोजक आणि चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच, अमिताभ बच्चन यांचा बंगला जलसावर 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान हल्ला करु अशी धमकी दिली आहे. या धमकीमागे नेमके कोण आहे आणि त्यांचा उद्देश काय आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील दादर परिसरातील तीन ते चार शाळांना सकाळच्या सुमारास धमकीवजा ई-मेल प्राप्त झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित शाळांच्या परिसराची तपासणी केली. प्राथमिक तपासादरम्यान संशयास्पद वस्तू आढळून आल्या नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, धमकीच्या ई-मेलमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर ही धमकी समोर आल्याने मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अमिताभ बच्चन, सलमान खान आणि आमिर खान यांसारख्या कलाकारांना टार्गेट करण्याचा हल्लेखोरांचा विचार होता आणि त्यानंतर टायगर श्रॉफवर पाळत ठेवण्यात आल्याचा दावाही समोर आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group