राजकीय हालचालींना वेग आला असून सध्या पक्षांतराचे सत्र सुरूच आहे. दरम्यान आता राजकारणातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. पुन्हा एकदा इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला मोठा झटका बसला आहे. ऐन उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने सपाला मोठा धक्का दिला आहे. समाजवादी पक्षाच्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
यामध्ये गौरीगंज विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले राकेश प्रताप सिंह, यांच्यासह अयोध्याच्या गोसाईगंज विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभय सिंह आणि कालपी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद चतुर्वेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आह. भाजपच्या राष्ट्रीय महामंत्री स्मृती इरानी आणि प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला हजारो कार्यकर्ते आणि भाजपाचे इतरही आमदार उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमात बोलताना विनोद चतुर्वेदी यांनी अयोध्या येथील राम मंदिराबद्दल केंद्रातील मोदी सरकारचं कौतुक केलं, तसेच भाजपाच्या सत्ता काळात बुंदेलखंडाचा विकास झाल्याचं देखील त्यांनी म्हटलं. जेव्हा राम मंदिराचं उद्घाटन झालं तेव्हा आम्हाला त्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमच्या हायकमांडने परवानगी दिली नव्हती असंही ते यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सपाचे तीन बडे नेते भाजपमध्ये गेल्याने आता सपाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.