"नाशिकच्या येवला शहरातून एका मोठ्या दुर्घटनेची बातमी समोर येत आहे. येवल्यातील अंबिया शहा कॉलनी परिसरात एका भंगार गोडाऊनला अचानक भीषण आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले आणि शेजारील दोन घरांनाही आपल्या तडाख्यात घेतले. आगीची तीव्रता एवढी भयानक होती की, जवळपास ५ किलोमीटर दूरपर्यंत आगीचे काळे ढग आणि धुराचे लोट स्पष्ट दिसत होते.
घटनास्थळी एकच धावपळ उडाली, मात्र स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत घरातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवल्याने एक मोठी जीवितहानी टळली आहे. आग विझवण्यासाठी येवल्यासह कोपरगाव, वैजापूर, नांदगाव आणि निफाड येथून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनंतर तब्बल दोन तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत गोडाऊन आणि घरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती."