अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली असून, महायुतीचे (शिवसेना शिंदे गट) उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर मतमोजणीनंतर किरण सरनाईक यांनी बाजी मारली. दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या मतमोजणीत किरण सरनाईक यांनी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करत महाविकास आघाडीच्या (काँग्रेस) उमेदवार अदिती पोहरे यांचा पराभव केला.
दुसऱ्या पसंतीच्या मतांनी ठरवला विजय अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत विजयी घोषणेसाठी वैध मतदानापैकी १६,१३४ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराला हा कोटा पूर्ण करता आला नव्हता. मात्र, दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या मतमोजणीत किरण सरनाईक यांनी हा कोटा यशस्वीरीत्या पूर्ण करत विजयावर शिक्कामोर्तब केले.