दिल्लीतील तिरंगा मार्चपूर्वी ताब्यात घेतलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आज विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे. त्यामुळे अभिजीत दीपके यांना न्यायालयीन कोठडी सुनावली जाणार का आणि त्यांची रवानगी तिहार तुरुंगात होणार का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
अभिजीत दीपके आणि नेहा बोरा या दोघांना दिल्ली पोलिसांनी तिरंगा मार्चपूर्वी ताब्यात घेतले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि सीजेपीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या अटकेच्या निषेधार्थ सीजेपीने शुक्रवारी दिल्लीमध्ये तिरंगा मार्च काढला होता. पण दिल्ली पोलिसांनी सेंट्रल पार्कवर तिरंगा फडकवण्यासाठी फक्त ११ जणांना परवानगी दिली होती. या मार्चसाठी निघण्यापूर्वीच पोलिसांनी अभिजीत दीपकेला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर नेहा बोराला ताब्यात घेण्यात आले होते.
या सर्व घडामोडीमुळे सीजेपी नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्याप्रमाणे अभिजीत दीपके यालाही तिहार तुरुंगात पाठवले जाईल का? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. जंतर मंतर येथे आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईनंतर रांका आणि दास या दोन्ही नेत्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना कोर्टाने ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अभिजीत दीपकेला अटक केल्यानंतर आज त्याला कोर्टासमोर हजर केले जाईल. कोर्ट काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.