एशियन गेम्स २०२६ मध्ये पुन्हा एकदा महिला संघाने आपली छाप सोडली असून एशियन गेम्सच्या महिला कबड्डीच्या फायनलमध्ये भारतीय महिला संघानं इतिहास रचला. अंतिम लढतीत इराणसारख्या बलाढ्य संघाला ३७-३४ च्या गुणफरकानं मात देत सुवर्णपदकावर नाव कोरलं. एशियन गेम्स २०२६ मध्ये महिला कबड्डी इव्हेंटमध्ये भारताच्या खात्यात हे तिसरं सुवर्णपदक आहे. इराण आणि भारत या दोन्ही संघात अखेरपर्यंत रोमहर्षक लढत झाली. या सामन्यात भारतीय संघानं पहिल्या हाफपासूनच आघाडी राखली होती. इराणच्या संघाला दोनदा ऑलआऊट करण्याची किमया केली.
भारतीय महिला कबड्डी संघ एशियन गेम्स २०२६ च्या सुरुवातीपासूनच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. अपेक्षेप्रमाणे सुरुवातीपासूनच भारतीय संघाची कामगिरी जबरदस्त होती. अंतिम लढतीपर्यंत भारतीय संघ फॉर्मात राहिला. ग्रुप स्टेजमध्ये भारतीय महिला कबड्डी संघाचा एकतर्फी वरचष्मा राहिला. तर सेमिफायनल सामन्यात एकतर्फी विजय मिळवून सगळ्यांनाच धक्का दिला. सुवर्णपदकासाठी झालेल्या अंतिम लढतीत तगड्या इराणने अपेक्षित तगडी टक्कर दिली. पहिल्या हाफमध्ये एकावेळी तर दोन्ही संघांचे गुण ७-७ असे बरोबरीत होते. मात्र, त्यानंतर भारतीय महिला कबड्डी संघानं आक्रमक खेळ करत आघाडीकडे कूच केली. पहिला हाफ डाव संपेपर्यंत इराणला ऑलआऊट करून २२-१६ अशी आघाडी घेतली.
पहिल्या हाफपर्यंत भारतीय संघानं घेतलेली आघाडी बघता इराणवर एकतर्फी विजय मिळवेल, असं वाटलं होतं. पण इराणने त्यानंतर आक्रमक खेळ करत जोरदार कमबॅक केलं. एका वेळी तर भारतीय संघाला ऑलआऊट देखील केलं. त्यामुळे आघाडी काही गुणांनी कमीही झाली. पण भारतीय संघानं पुन्हा आक्रमक खेळ करत इराणला कमबॅक करण्याची संधी दिली नाही. उलट इराणला ऑलआऊट करून विजयी आघाडी कायम राखली. सामना संपेपर्यंत भारतीय संघ ३७-३४ अशा गुणांनी आघाडीवर राहिला आणि सुवर्णपदकावर नाव कोरून इतिहास घडवला.