राजकीय हालचालींना वेग आला असून आता शिंदे सेनेच्या गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे . शिंदे गटाच्या एका नेत्याला अटक झाली असून राजकारणात एकच खळबळ निर्माण झाली आहे.
पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत शिंदेसेनेच्या नेत्याला अटक केली. पुण्यामध्ये शिवसेना शिंदे गटात प्रमुख पदावर असलेला तुषार हंबीरला पुणे पोलिसांनी अटक केली. फुरसुंगी परिसरातून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. मोक्काअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात तुषार हंबीर गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. अखेर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली. या कारवाईमुळे पुण्यातील राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजगड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि खंडणीच्या गंभीर गुन्ह्यात मोक्का कारवाई झाल्यानंतर फरार असलेल्या शिंदेसेनेच्या नेत्याला अटक करण्यात आली. तुषार नामदेव हंबीर (वय ४०) असं या शिवसेना नेत्याचे नाव आहे. तो हडपसर येथा राहतो. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्या. २४ ऑक्टोबर रोजी फुरसुंगी परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली.
राजगड परिसरातील एका व्यावसायिकाच्या मुलाचे कापूरहोळ ते नारायणपूर रस्त्यावरून अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी कार आडवी घालत तरुणाला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. तसेच पिस्तुलाची नळी तोंडात घालून जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये मोक्क्यासह विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या गुन्ह्यानंतर शिवसेना नेता तुषार हंबीर फरार होता. अटकेपासून बचाव करण्यासाठी तो वारंवार राहण्याची ठिकाणे आणि मोबाईल सिमकार्ड बदलत होता. अखेर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला फुरसुंगीतून अटक केली. हंबीर याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, शासकीय कामात अडथळा आणि आर्म्स ॲक्टसह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.