राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट ) लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पक्षातील संभाव्य बदलांबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. पक्षसंघटनेत बदल होणार की मंत्रिमंडळातील काही चेहऱ्यांना डच्चू मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकी कोणाची भाकरी फिरणार आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेना शिंदेगटापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल होण्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली सध्या सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादीतील अकार्यक्षम मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूर अधिवेशनापूर्वी याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०२४ ला विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या भरगोस यशानंतर आता महायुती सरकारला जवळपास अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. अशातच इतर निवडून आलेल्या प्रतिनिधींनाही संधी मिळण्यासाठी आता शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही जुन्या मंत्रांना डच्चू देऊन नवीन चेहऱ्याला संधी देण्यासंदर्भात हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये अकार्यक्षम मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे महायुतीची प्रतिमा उंचावण्यासाठी आणि जनतेमध्ये विश्वास संपादन करण्यासाठी काही नवीन चेहऱ्यांनाही यापुढे संधी देण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांची प्रतिमा वेगवेगळ्या गोष्टीमुळे डागाळली असल्यामुळे जनतेच्या मनात या संदर्भात राग असल्याचेही समोर आलं होतं.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही वादग्रस्त आणि वाचाळवीर मंत्र्यांना डच्चू देऊन त्या व्यतिरिक्त काही नव्या आणि काही अनुभवी चेहऱ्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळ घेण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याची देखील माहिती मिळत आहे. लवकरच याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची देखील बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लवकरच याबाबत निर्णय घेतील. पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून देखील याबाबत सल्ला घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.