राज्याच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भाजपच्या नेत्यावर जमावाने जीवघेणा हल्ला केला असल्याची घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ निर्माण झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार , अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यावर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल संध्याकाळी घडली. ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील अनधिकृत अतिक्रमण काढण्याची मागणी शेटे यांनी केली होती. याच रागातून अतिक्रमण हटाव पथकासोबत वाद झाल्यानंतर, गणपती मंदिर परिसरातून जाणाऱ्या ऋषिकेश शेटे यांच्यावर फळविक्रेते व जमावाने चाकूने वार करत त्यांच्या गाडीची तोडफोड केली.
घटनेच्या वेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखून जमावाचा प्रतिकार केल्यामुळे ऋषिकेश शेटे या हल्ल्यातून बचावले आहेत. या हिंसक घटनेप्रकरणी पोलिसांनी रात्रीच ९० ते १०० जणांच्या जमावावर गुन्हा दाखल केला असून ७ जणांना ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.
नगरपंचायतीच्या पथकाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होती. त्यावेळी काही फेरीवाल्यांनी त्याला तीव्र विरोध केला. या कारवाईदरम्यान ऋषिकेश शेटे यांची गाडी पथकाच्या मागाहून जात होती. त्यामुळे उपस्थितांमध्ये गैरसमज पसरला. या गैरसमजातून काही नागरिक आक्रमक झाले आणि त्यांनी शेटे यांच्या गाडीची तोडफोड केली.
घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी याप्रकरणी ७ जणांना ताब्यात घेतले असून तक्रार नोंदवण्याची व पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, "कोणीही कायदा हातात घेऊ नये, परिसरात शांतता ठेवावी. काही अडचण किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा; दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल," असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.