नेपाळमध्ये काल महाप्रलय आला असून तिथे विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. . या जलप्रलयात 160 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे नेपाळमध्ये हाहा:कार उडाला आहे.दरम्यान आता नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांबद्दल राज्याचे मंत्री गिरीश महाजन महत्वाची अपडेट दिली आहे.
नेपाळच्या मानसरोवरसाठी भारतातूनही अनेक पर्यटक गेले होते. महाराष्ट्रातून काही पर्यटक गेले होते. अनेक पर्यटक वेगवेगळ्या राज्यातील आहेत. मात्र, या पर्यटकांपैकी फक्त चारच पर्यटकांशी संपर्क झाला असल्याचं राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. तसेच, तुमचे नातेवाईक, शेजारी किंवा ओळखीचे कोणी नेपाळला गेले असतील तर आमच्याशी संपर्क करा. आम्ही त्या लोकांचा शोध घेऊ, असं आवाहन महाजन यांनी केलं आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. नेपाळमध्ये ग्लेशियर तुटल्याने नद्यांना महापूर आला. या महापुरामुळे गावं विदारक परिस्थितीत वाहून गेली आहेत. मानसरोवरलाही मोठा पूर आला. आपले काही पर्यटक तिकडे गेले आहेत. रिचा टूर ट्रॅव्हल्सच्या दोन गाड्यांमधून पर्यटक मानसरोवरला गेले. चार जणांशी संपर्क झाला आहे. माझ्या शेजारचं कुटुंबही पाच सहा दिवसापूर्वी नेपाळला गेलं होतं. मी लगेच त्यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या गाडीत 37 लोक आहेत. ते सर्व कुठले आहेत ते माहीत नाही. काही आंध्र प्रदेशातील आणि दक्षिणेकडील आहेत. महाराष्ट्रातील किती लोक त्यात आहेत हे समजू शकलं नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.
माझ्या शेजारच्या लोकांशी माझा संपर्क झाला होता. त्यानंतर मी आज परत सकाळपासून त्यांच्याशी संपर्क करतोय. तो होत नाही. ते प्रदक्षिणा करत आहेत. या आधी त्या चार जणांशी संपर्क झाला होता. ते सुखरूप आहेत. अजून किती लोक अडकलेत याची आम्ही माहिती घेत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनाही माहिती घेण्यास सांगितलं आहे. वेबसाईटही खुली केली आहे. कुणाकडे काही माहिती असेल तर कळवा. दिल्लीशी संपर्क सुरू आहे. आम्ही सर्वजण 24 तास अलर्ट मोडवर आहोत. कुणाला काही माहिती मिळाली तर आमच्याशी संपर्क करा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
नेपाळ सरकारच्या संपर्कात
आम्ही नेपाळ सरकारशीही संपर्क साधून आहोत. पंतप्रधानही त्यात लक्ष घालून आहोत. आम्ही माहिती घेतच आहोत. कुणाकडे माहिती असेल तर सांगा. केंद्र आणि राज्य अलर्ट मोडवर आहे. आम्ही लोकांना इतरांची माहिती विचारत आहोत. आम्हाला कळवा. जिल्हाधिकाऱ्यांना कळवा. तुमच्या आजूबाजूचे, नातेवाईक किंवा ओळखीचे कोणी गेले असतील तर तात्काळ कळवा. म्हणजे शोध घेता येईल, असंही ते म्हणाले.