नेपाळमध्ये काल ग्लेशियर फुटल्याने जलप्रलय आला. या महाजलप्रलयाने सर्वत्र हाहाकार माजवला असून या जलप्रलयात आता पर्यंत 160 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो लोक बेपत्ता आहेत. दरम्यान, आता या महाप्रलयाबाबत एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे.
नेपाळवरील धोका अजून टळलेला नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 47 हिमनद्यांचा नेपाळला संभाव्य धोका असल्याचं इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटीग्रेटेड माऊंटेन डेव्हल्पमेंट आणि नेपाळ सरकारच्या संशोधकांनी म्हटलं आहे.
कोणत्याही क्षणी हिमकडा तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेपाळच्या नद्यांना विनाशकारी महापूर येऊ शकतो. या 47 हिमनद्यांपैकी 21 हिमनद्या एकट्या नेपाळमध्ये आहेत. तर 25 हिमनद्या या तिबेटमध्ये आहेत. विशेष म्हणजे या हिमनद्या तिबेटच्या सीमेवर आहेत. ज्या नद्या दक्षिणेकडून नेपाळमध्ये प्रवेश करतात त्या भागात या हिमनद्या आहेत. त्यामुळे नेपाळच्याा खालच्या भागाला मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे
कोणत्या हिमनद्या सर्वाधिक धोकादायक?
वेगाने वाहणाऱ्या, दगडगोटे आणि ढिगारा घेऊन वाहणाऱ्या हिमनद्या या सर्वाधिक खतरनाक असल्याचं संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे यूएनडीपीने सांगितलं आहे. या नद्या धोकादायक असल्याने त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या हिमनद्यांमध्ये लोअर बरुण (टॅलोपोखरी), थुलागी (डोना), लुमडिंग त्सो, होंगु-2/चामलांग साऊथ, त्सो रोल्पा आणि इमजा त्सो या हिमनद्या सर्वाधिक खतरनाक आणि धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
डोंगराळ भागात अधिक धोका
या हिमनद्यांचा सर्वाधिक धोका हा डोंगराळ भागात आणि डोंगराळ भागाच्या जवळ असलेल्या जिल्ह्यांना आहे. या नद्या खोऱ्यातून वाहत आहेत. त्यामुळे जर एखादा मोठा ग्लोफ जाला तर या परिसरातील नागरिकांच्या जीवावर बेतू शकतं. त्यांना मोठं नुकसान होऊ शकतं, असं सांगण्यात आलं आहे. पूर्व आणि मध्य नेपाळ यात कोशी आणि बागमती नदीचा समावेश आहे. या परिसरात 85 टक्के धोका आहे. हा संपूर्ण परिसर संवेदनशील आहे, असंही सांगण्यात आलं आहे.
तसेच ज्या जिल्ह्यांना या हिमनद्यांचा सर्वाधिक धोका होऊ शकतो, त्यात सोलुखुम्बू जिल्ह्याचा समावेश आहे. संखुवासभा जिल्हा मुख्यत: बरूण आणि अरुण नदीच्या किनारी आहे. दोलखा जिल्हा तामा कोोशी नदीच्या बाजूला आहे. तर त्सो रोल्पा जिल्ह्यालाही नदीचा धोका असल्याचं सूत्रांनी सांगितलं.