आई आणि लेकराचं नातं या जगातील सर्वात शक्तिशाली नातं असत हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही कारण ऐका १० वर्षाच्या लेकीनं आपल्या आईला वाचवण्याकरता चक्क मगरीसोबत झुंज दिली आहे.
चिपळूण तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीपात्रात मगरीने महिलेवर हल्ला केल्याची ही थरारक घटना घडली. या घटनेत आईवर मगरीने हल्ला केल्यानंतर अवघ्या १० वर्षांच्या मुलीने प्रसंगावधान राखत आईला मगरीच्या तावडीतून बाहेर खेचले. स्वर्णी पवार या चिमुकलीने दाखवलेल्या धाडसामुळे तिच्या आईचा जीव वाचला असून, परिसरात तिच्या शौर्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
नंदिनी पवार या कपडे धुण्यासाठी वाशिष्ठी नदीवर गेल्या होत्या. नदीपात्रात त्या कपडे धुत असतानाच अचानक मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. मगरीने नंदिनी पवार यांचा पाय पकडला आणि त्यांना पाण्यात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नंदिनी पवार यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
आईचा आवाज ऐकताच जवळच असलेली त्यांची १० वर्षांची मुलगी स्वर्णी धावत आईजवळ पोहोचली. समोर मगरीने आईचा पाय पकडल्याचे पाहूनही स्वर्णी घाबरली नाही. तिने आईचा हात घट्ट पकडला आणि पूर्ण ताकदीनिशी तिला नदीच्या दिशेने बाहेर ओढण्यास सुरुवात केली. मगरीसोबत झुंज देत असताना आईला वाचवणे एवढाच विचार तिच्या मनात होता.
‘आईला सोडायचं नाही, एवढंच मनात होतं. मी पूर्ण ताकदीने आईला बाहेर ओढलं,’ असा थरारक अनुभव स्वर्णीने सांगितला. अखेर स्वर्णीच्या प्रयत्नांना यश आले आणि नंदिनी पवार यांची मगरीच्या तावडीतून सुटका झाली. मात्र, या हल्ल्यात नंदिनी पवार जखमी झाल्या असून त्यांच्यावर कामथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अवघ्या १० वर्षांच्या स्वर्णीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. मगरीच्या तावडीत अडकलेल्या आईला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाहेर खेचणाऱ्या या चिमुकलीच्या धाडसाला परिसरातून सलाम केला जात आहे. स्थानिकांकडून तिचे कौतुक केले जात आहे.