आधीच गेल्या अनेक दिवसांपासून देशातील महागाईने सर्वसामान्या माणूस त्रस्त झाला असून आता साखरेच्या भावामध्ये नुकत्याच झालेल्या दरवाढी मुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसली आहे. कारण सध्या साखरेच्या इतिहासात सर्वात मोठी वाढ झाली आहे. साखर 7 हजार 500 प्रति क्विंटलवर गेली आहे. वाशिम जिल्ह्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर 80 रुपयांवर गेले आहेत. याचा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. साखर दरवाढीनंतर आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी काही सवाल उपस्थित करत सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद आहे, साखरेचे दर वाढले तर माझ्यासारख्या नेत्याला आनंद झाला असता, मात्र हे पैसे शेतकऱ्यांना नाहीतर व्यापाऱ्यांच्या घशात जाणार आहेत, दिवाळीपर्यंत पुरेल इतका साखरेचा साठा यंदाच्या हंगामातील आहे आणि पुढील उत्पादन देखील देशाला पुरेल इतकं असताना अचानक दर कसे काय वाढले असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
अचानक साखरेच्या दरांमध्ये जे काही उसळी घेतलेली आहे, ती कुठंतरी संशयास्पद आहे. कारण यावर्षी एकूण पीक पाहणी पाहता, पुढील सिझनमधे देशाला पुरेल इतकं साखरेचं उत्पादन होणार आहे हे तर स्पष्ट आहे. सरकारनं कितीही प्रयत्न केला, आयात करण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा, ऑक्टोबरच्या आत साखर काही बाहेरच्या देशातून येऊ शकत नाही आणि जी शिल्लक साखर आहे, जे रेकॉर्ड आज सरकार दाखवतंय, साखर कारखाने दाखवतात, ते बघितलं तर अगदी दिवाळी होऊन सुद्धा आपल्याला पुरेशी साखर शिल्लक राहते, असं असताना साखरेच्या दरामध्ये संशयास्पद रीत्या उसळी मारणं, हे कुठंतरी पाणी मुरत असल्याचं दिसतंय, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
पुढे राजू शेट्टी यांनी बोलताना म्हटलं की, मुळामध्ये मी एक शेतकरी नेता आहे. मला साखरेच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर आनंद व्हायला पाहिजे होता, झालेलाही आहे. परंतु लगेच साखर कारखानदारांनी आम्ही आधीच साखर विकून टाकलेली आहे आणि आमच्याकडं आता फारशी साखर शिल्लक राहिलेली नाही असा कांगावा करायला सुरुवात केलेला आहे. याचाच अर्थ असा होतो की, कुठंतरी साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं होतं आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी कमी दरामध्ये साखर विकत घेऊन तिथंच साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये ठेवून दिलेली आहे आणि आता जे काही मार्केटमध्ये साखर जाणार आहे, ती जुजबी किरकोळ कारखान्यांचीच साखर असणार आहे, परंतु व्यापाऱ्यांची आणि रिकव्हरी चोरून जो रेकॉर्डमध्ये नसलेली साखर तयार होते, तीच साखर बाजारामध्ये येणार आहे आणि त्याच साखरेला चढ्या दराचा फायदा होणार आहे, म्हणजे हे पैसे रिकव्हरी चोरून काळा पैसा तयार करणाऱ्या कारखानदारांच्या घशात जाणार आहेत, व्यापाऱ्यांच्या घशात जाणार आहेत.