नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- गंगापूर रोडवरील पंपिंग स्टेशनजवळ असलेल्या अवंती स्नॅक्स या हॉटेलची अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केली असता अनेक त्रुटी आढळल्या. त्यामुळे या हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. या घटनेमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन, नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये सेफ फुड, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत राज्याचे आयुक्त तुकाराम मुंडे, तसेच नाशिक विभागाचे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) मंगेश माने आणि सहाय्यक आयुक्त विनोद धवड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी मे. अवंती स्नॅक्स, शॉप क्र. 3, गंगानिवास सोसायटी, मामामुंगी मंगल कार्यालयाजवळ पंपिंग स्टेशन रोड, गंगापूर रोड या पेढीची अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत तपासणी केली.
या तपासणीच्या वेळी आस्थापनेमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. अन्न पदार्थ वृत्तपत्रांवर ठेवलेले आढळलेले, कच्चे अन्नपदार्थ स्वीकारण्यापूर्वी तपासले नाही, कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आढळले नाही, पेस्ट कंट्रोल केलेले आढळलेले नाही, भिंतींना रंगरंगोटी केलेली आढळली नाही. अशा विविध तरतुदींचे उल्लंघन झालेले आढळून आले. त्यामुळे बुधवार (दि. 19) पासून अवंती स्नॅक्सचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त मंगेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार विभाग नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणास सर्वोच्च प्राधान्य देत असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्या कोणत्याही अन्न व्यावसायिकास कोणतीही सवलत दिली जाणार नाही. नाशिक विभागात सुरू असलेली विशेष तपासणी मोहीम पुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार आहे. अन्न व्यवसायिकांनी स्वच्छता, सुरक्षित अन्न उत्पादन, साठवणूक, हाताळणी व विक्री याबाबत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 तसेब त्याअंतर्गत नियम व विनियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच नागरिकांनीही कोणत्याही अन्नपदार्थाबाबत दर्जा, स्वच्छता किंवा सुरक्षिततेबाबत शंका असल्यास अन्न व औषध प्रशासन विभाग, नाशिक यांच्याकडे तक्रार नोंदवून सुरक्षित अन्न अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन माने यांनी केले आहे.