भाड्याने  घर  पाहायला गेलेल्या पती-पत्नीसोबत घडलं भयकंर ! पिटबुलचा अचानक हल्ला अन..
भाड्याने घर पाहायला गेलेल्या पती-पत्नीसोबत घडलं भयकंर ! पिटबुलचा अचानक हल्ला अन..
img
Nandini khandare More
 घर भाड्याने पाहायला गेलेल्या पती-पत्नीसोबत अतिशय गंभीर घटना घडली आहे. य दाम्पत्यावर पिटबुल कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना पटियालातील घुम्मन नगर परिसरात घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. 

प्रॉपर्टी डीलरच्या सांगण्यावरून घर पाहण्यासाठी गेलेल्या अंकित सभरवाल आणि त्यांच्या पत्नी शिफाली यांच्यावर घराचा मुख्य दरवाजा उघडताच पिटबुलने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून शिफाली यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मंगळवारी संध्याकाळी अंकित सभरवाल हे पत्नी शिफाली यांच्यासोबत भाड्याने घर पाहण्यासाठी घुम्मन नगर येथे गेले होते. प्रॉपर्टी डीलरने त्यांना हे घर दाखवण्यासाठी बोलावलं होतं. घर पाहण्यासाठी दोघेही मुख्य गेटजवळ पोहोचले. मात्र, गेटचा दरवाजा उघडताच आत असलेल्या पिटबुल कुत्र्याने अचानक दोघांवर हल्ला केला.

अंकित यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना काही समजण्यापूर्वीच कुत्र्याने त्यांच्या पत्नीवर झडप घातली. त्याने शिफाली यांच्या हात आणि मांडीवर चावा घेत त्यांना गंभीर जखमी केलं. हल्ला इतका भीषण होता की त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर मेजर सर्जरी करावी लागली. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

पत्नीवर हल्ला होत असल्याचं पाहून अंकित यांनी तिला वाचवण्यासाठी पिटबुलशी झुंज दिली. या प्रयत्नात कुत्र्याने अंकित यांच्यावरही हल्ला केला. त्यांच्या पायासह पाठ आणि शरीराच्या इतर भागांवर खोल जखमा झाल्या आहेत. शरीरावर अनेक ठिकाणी टाके घालावे लागल्याचं त्यांनी सांगितलं.

अंकित यांच्या म्हणण्यानुसार, कुत्र्याचा मालक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याच्या आरडाओरडीनंतरही कुत्रा थांबला नाही. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, आजूबाजूचे नागरिक मदतीला धावून आले नसते तर आपला जीवही गेला असता अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

‘आम्हाला फक्त न्याय हवा’

या घटनेनंतर अंकित सभरवाल यांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. निष्काळजीपणामुळे आपल्यावर आणि आपल्या पत्नीवर हा जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दोषी व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, अंकित सभरवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून प्रकरण दाखल केलं आहे. कुत्र्याच्या मालकाने निष्काळजीपणा केला का, याचा तपास सुरू असून संबंधित व्यक्तीविरोधात कारवाई केली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group