येवल्याच्या पैठणीचा राष्ट्रीय गौरव; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येवला पैठणीच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी
येवल्याच्या पैठणीचा राष्ट्रीय गौरव; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येवला पैठणीच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी
img
दैनिक भ्रमर
येवला :- महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरेची जगभर ओळख निर्माण करणाऱ्या येवला पैठणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित १२व्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या सोहळ्यात भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘संत कबीर हातमाग पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय हातमाग पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आले. याच ऐतिहासिक सोहळ्यात महाराष्ट्राची अस्मिता आणि येवल्याच्या समृद्ध हातमाग परंपरेचे प्रतीक असलेल्या येवला पैठणीच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले. येवला पैठणीला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान म्हणजे येवल्याच्या विणकर बांधवांच्या पिढ्यान्‌पिढ्यांच्या मेहनतीला मिळालेली राष्ट्रीय पावती आहे.

येवला पैठणी ही केवळ एक साडी नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची, कलात्मकतेची आणि कुशल हातांची ओळख आहे. हातमागावर अत्यंत बारकाईने, संयमाने आणि कौशल्याने विणली जाणारी पैठणी आज देशाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. राष्ट्रपती भवनातून येवला पैठणीच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी होणे हा संपूर्ण येवल्याच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण आहे.

येवल्याच्या हातमाग व्यवसायाला मोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. विणकर समाजातील कारागीरांनी आपल्या पूर्वजांकडून मिळालेली विणकामाची कला जपत ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविली आहे. पैठणीतील पारंपरिक नक्षीकाम, मोर, कमळ, आसावली, नारळी, मुनीया यांसारख्या विविध कलाकुसरीमुळे येवला पैठणीला देशभरात विशेष ओळख मिळाली आहे.

विणकरांच्या हातातील कौशल्य, डिझाइनमधील बारकावे, रंगांची निवड आणि पारंपरिक तंत्राचा आधुनिक बाजारपेठेशी केलेला मेळ यामुळे येवला पैठणीने देशाच्या वस्त्रोद्योगात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आता या पैठणीचे चित्र टपाल तिकिटाच्या माध्यमातून देशभर पोहोचणार असल्याने येवला आणि येवला पैठणीची राष्ट्रीय ओळख आणखी भक्कम होणार आहे.

येवल्याची ओळख देशाच्या वस्त्रोद्योगाच्या नकाशावर अधिक ठळक व्हावी आणि पैठणी उद्योगाला आधुनिक काळानुसार नवी दिशा मिळावी, यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ सातत्याने प्रयत्नशील आहेत. पैठणी हा येवल्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून या उद्योगाशी हजारो विणकर, कारागीर, व्यापारी आणि विविध घटक जोडलेले आहेत. त्यामुळे पैठणी उद्योगाचा विकास म्हणजे केवळ एका पारंपरिक कलेचा विकास नसून हजारो कुटुंबांच्या रोजगाराला आणि आर्थिक स्थैर्याला बळ देणे आहे. याच दृष्टिकोनातून येवल्यातील पैठणी उद्योगाला आधुनिक सुविधा, बाजारपेठ, पर्यटन आणि रोजगाराशी जोडण्यासाठी विविध उपक्रमांना चालना देण्याचे काम मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

येवल्यात पैठणी पर्यटन केंद्र उभारण्याच्या माध्यमातून पैठणी विणकामाची प्रत्यक्ष प्रक्रिया पर्यटकांना अनुभवता यावी, पैठणी निर्मितीचा इतिहास आणि परंपरा समजावी तसेच स्थानिक कारागिरांना थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने प्रयत्न सुरू आहेत. पैठणी पर्यटन केंद्रामुळे येवल्याला केवळ पैठणी खरेदीचे केंद्र म्हणून नव्हे, तर ‘पैठणी नगरी’ म्हणून पर्यटनाच्या नकाशावर विकसित करण्यास मोठी मदत होत आहे. देश-विदेशातील पर्यटक येवल्यात आले, त्यांनी हातमागावर पैठणी तयार होताना पाहिली, कारागिरांशी संवाद साधला आणि थेट पैठणी खरेदी केली, तर त्याचा थेट फायदा विणकर व कारागिरांना होत आहे.

पैठणी उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी पैठणी क्लस्टरची निर्मिती हा महत्त्वाचा टप्पा आहे. विणकरांना आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, डिझाइन विकास, कच्चा माल, उत्पादन, पॅकेजिंग आणि बाजारपेठ यांची सांगड घालून पैठणी उद्योग अधिक सक्षम करण्याचा मंत्री छगन भुजबळ यांचा प्रयत्न आहे. क्लस्टरच्या माध्यमातून स्थानिक विणकरांना संघटित स्वरूपात सुविधा मिळाल्यास उत्पादनाची गुणवत्ता वाढण्यासोबतच नवीन बाजारपेठा उपलब्ध होतील. पारंपरिक पैठणीचे जतन करताना आधुनिक ग्राहकांच्या आवडीनुसार नवीन डिझाइन व उत्पादन विकसित करण्यासही यामुळे चालना मिळणार आहे.

येवल्यातील हातमाग कामगार आणि विणकरांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. विणकरांचे आर्थिक सक्षमीकरण, कौशल्यविकास, आधुनिक साधनसामग्री, प्रशिक्षण, कर्ज सुविधा, विमा आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे.‘विणकर टिकला तर पैठणी टिकेल आणि पैठणी टिकली तर येवल्याची सांस्कृतिक ओळख टिकेल’, या भावनेतून विणकरांच्या अडचणी सोडवून त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रातून येवला पैठणीच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी झाल्यामुळे येवला पैठणीची राष्ट्रीय पातळीवरील ब्रँड ओळख आणखी मजबूत होणार आहे. या गौरवाचा उपयोग पैठणीला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी करणे गरजेचे आहे. ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग, प्रदर्शन, फॅशन डिझायनर्सशी सहकार्य, पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सवांच्या माध्यमातून येवला पैठणीला नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने मिळालेला हा सन्मान येवला पैठणी उद्योगाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल.

आज राष्ट्रपती भवनात येवला पैठणीचा गौरव झाला असला तरी त्यामागे येवल्यातील असंख्य विणकर कुटुंबांच्या कष्टाचा, त्यागाचा आणि कौशल्याचा मोठा वाटा आहे. उन्हाळा-पावसाची तमा न बाळगता हातमागावर तासन्‌तास बसून कलाकुसर करणाऱ्या विणकरांच्या हातांना मिळालेला हा सन्मान आहे.राष्ट्रपती भवनातून जारी झालेले टपाल तिकीट म्हणजे येवला पैठणीच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणारा क्षण आहे. या राष्ट्रीय गौरवामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता, येवल्याची पैठणी परंपरा आणि विणकरांच्या कष्टाला देशभर नवी ओळख मिळणार आहे.

आता या गौरवाला विकासाची जोड देत पैठणी पर्यटन केंद्र, पैठणी क्लस्टर, आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, बाजारपेठ आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ विणकरांपर्यंत पोहोचवून येवला पैठणी उद्योगाला देशातील अग्रगण्य हातमाग उद्योग म्हणून विकसित करण्याची गरज आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना या राष्ट्रीय गौरवाची जोड मिळाल्याने येवल्याच्या पैठणी उद्योगाच्या विकासाला निश्चितच नवी ऊर्जा मिळणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group