गेल्या अनेक दिवसांपासून अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असून काही ठिकाणी मोठे भूकंप आले आहेत. दरम्यान आता आता आज कोलंबियामध्ये मोठा भूकंप आला असून एकच खळबळ निर्माण झाली आहे.
सोमवारी कोलंबियामध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे किमान 132 लोकांचा मृत्यू झाला आणि 570 जण जखमी झालेत. देशातील पाच प्रमुख शहरांमध्ये 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सीएनएनच्या (CNN) वृत्तानुसार, या आपत्तीबाबत राष्ट्रपतींसोबत झालेल्या बैठकीत सहभागी असलेल्या एका संघटनेने सांगितले की, केवळ पेरेरा शहरातच 60 जणांचा मृत्यू झाला आहे. या वृत्तात नमूद केले आहे की, देशभरातील पाच प्रमुख शहरांमध्ये 'रेड अलर्ट' आहे.
कोलंबियाच्या अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले : तसेच 86 इमारती कोसळल्या असून, सात विमानतळांवरील कामकाज स्थगित करण्यात आले आहे. 'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या माहितीनुसार, सुमारे 5 लाख लोकसंख्या असलेले पेरेरा शहर भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून 64 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर स्थित आहे. राजधानी बोगोटासह कोलंबियाच्या अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, धोक्याचे सायरन वाजल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी अनेक इमारतींतून बाहेर पडून रस्त्यांवर आश्रय घेतला. यापूर्वी, अधिकारी अबेलार्डो डी ला एस्प्रिएला यांनी सांगितले होते की, 1577 निवासी इमारतींचे नुकसान झाले आहे, तर 37 इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. 'द न्यूयॉर्क टाइम्स'नुसार, त्यांनी माहिती दिली की, 60 हून अधिक इमारती कोसळल्या आणि 18 आरोग्य केंद्रे व 52 शाळांचेही नुकसान झाले आहे.
एक आपत्कालीन समिती स्थापन : रिसाराल्डाचे गव्हर्नर जुआन डिएगो पातिनो यांनी 'ब्लू-रेडिओ' (BluRadio) या रेडिओ स्टेशनला सांगितले की, पश्चिम मध्य कोलंबियातील रिसाराल्डा प्रदेशाला सर्वाधिक फटका बसला आहे. एका निवेदनात डी ला एस्प्रिएला यांनी सांगितले की, त्यांनी या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एक आपत्कालीन समिती स्थापन केली आहे आणि बाधित लोकांच्या सुरक्षिततेसाठी सरकार सर्व आवश्यक पावले उचलेल, असे आश्वासन दिले. भूकंपानंतरच्या या परिस्थितीतून देशाला सावरण्यास मदत करण्यासाठी आपण स्वतः या प्रयत्नांचे नेतृत्व करू, असे त्यांनी सांगितले.
लोक जखमी झालेत आणि इमारतींचे मोठे नुकसान : यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:34 च्या सुमारास या भूकंपाची नोंद केली. याचा केंद्रबिंदू कोलंबियाच्या चोको प्रदेशातील सॅन होजे डेल पाल्मार जवळ जो बोगोटापासून पश्चिमेकडे सुमारे 280 किलोमीटर अंतरावर आहे. 107 किलोमीटर खोलीवर होता. सीएनएनच्या (CNN) वृत्तानुसार, कोलंबियाच्या वायव्येकडील चोको (Chocó) प्रांताच्या गव्हर्नर नुबिया कॅरोलिना कोर्डोबा कुरी यांनी दुजोरा दिला की, प्रादेशिक राजधानी क्विबडो येथे काही लोक जखमी झालेत आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच त्यांनी संभाव्य 'आफ्टरशॉक्स' (भूकंपानंतरचे धक्के) बाबत चिंता व्यक्त केली.
मदतीचे साहित्य स्वीकारण्यासाठी सहा संकलन केंद्रे उभारली : दरम्यान, बोगोटाचे महापौर कार्लोस एफ. गालान यांनी 'एक्स' (X) वर जाहीर केले की, मदतीचे साहित्य स्वीकारण्यासाठी सहा संकलन केंद्रे उभारली जात आहेत. या केंद्रांमार्फत बाधित लोकांसाठी पिण्याचे पाणी, ब्लँकेट्स, लवकर खराब न होणारे अन्नपदार्थ, वैयक्तिक स्वच्छतेचे साहित्य आणि प्रथमोपचाराचे साहित्य गोळा केले जात आहे. त्यांनी 'एक्स'वर लिहिले, "भूकंपामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांसाठी मदत गोळा करण्याकरिता आम्ही बोगोटामध्ये सहा केंद्रे उभारली आहेत. आम्हाला पिण्याचे पाणी, ब्लँकेट्स, गोधड्या, चटया, लवकर खराब न होणारे अन्नपदार्थ, वैयक्तिक स्वच्छतेचे साहित्य आणि प्रथमोपचाराच्या साहित्याची गरज आहे. जर तुम्ही मदत करू शकत असाल, तर कृपया नक्की करा.
मदतकार्य सुरू ठेवण्यासाठी आम्ही सज्ज : त्यांनी पुढे सांगितले, "आतापर्यंत बोगोटामध्ये भूकंपाचा गंभीर परिणाम झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. सर्वाधिक बाधित शहरांमध्ये जाऊन शोध आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी बोगोटाहून 100 बचाव कर्मचाऱ्यांना पाठवण्याबाबत राष्ट्रीय सरकारसोबतची व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे. शक्य तितक्या जलद गतीने मदतकार्य सुरू ठेवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. या कठीण काळात आम्ही सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत."