अपघातांच्या प्रमाणत चिंताजनक वाढ झाली असून एक हातांत हृदयड्रावक अशी घटना घडली आहे. चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात सहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला.
ही आटूगडेवाडी (मेणी, ता. शिराळा) येथे घडली आहे. या अपघातात सहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. अन्य मुले जखमी झाली असून, त्यांच्यावर कोकरूड, शिराळा आणि कराड येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आज, सोमवारी (दि.१०) सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिराळा येथील सह्याद्री पब्लिक स्कूलची इंग्रजी माध्यमाची दुसरी शाखा वाघमारेवाडी येथे वर्षभरापूर्वी सुरू झाली आहे.
या शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शेडगेवाडी येथील युवराज कदम यांची चारचाकी (क्र. एमएच १० ईई ७९३१) वापरली जाते. सोमवारी सकाळी युवराज कदम विविध गावांतील विद्यार्थ्यांना घेऊन आटूगडेवाडी येथील एका विद्यार्थ्याला आणण्यासाठी गेले होते. विद्यार्थ्याला घेऊन परतत असताना आटूगडेवाडी येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर चारचाकी रस्त्यालगतच्या पुलाच्या कठड्यावर जोरदार आदळली.
या अपघातात चालकाच्या शेजारी बसलेली श्रीशा श्रीनाथ ऊर्फ गणेश इंगळे (वय ६, रा. मेणी) हिचा जागीच मृत्यू झाला. अन्य मुले जखमी झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी कोकरूड, शिराळा आणि कराड येथील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.