तळीरामांसाठी आता मोठी गुड न्यूज समोर आली आहे. देशात मद्यप्रेमींची कमी नसून मद्य खरेदीसाठी तळीरामांना मोठा मोठया रंगांची झंजट सहन करावी लागते. घरातून निघण्याची इच्छा नसते पण तलफ आलीकी बाहेर जाऊन मद्य खरेदी केल्याशिवाय दुसरा पर्याय पण उरत नाही.
मात्र आता दारूसाठी रांगेची झंझट संपणार आहे. कारण एका राज्यात आता मद्य खरेदी ऑनलाइन करता येणार आहे. तमिळनाडूमध्ये दारू विक्रीची पद्धत आता पूर्णपणे बदलणार आहे. ग्राहकांना एमआरपीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागू नयेत आणि दारू खरेदी अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन (TASMAC) गुरुवारी एक खास मोबाईल ॲप लाँच करत असून, त्याद्वारे ग्राहकांना दारूची किंमत तपासण्यापासून ते ऑनलाइन पेमेंट करून ऑर्डर देण्यापर्यंत सर्व सुविधा, अवघ्या एका क्लिकवर मिळणार आहेत.
राज्यातील 4038 TASMAC रिटेल दुकानांमध्ये ही सेवा लागू करण्यात येणार आहे. ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना जवळचे दुकान शोधता येईल. त्याचबरोबर त्या दुकानात कोणते ब्रँड उपलब्ध आहेत, त्यांची किंमत किती आहे आणि स्टॉक उपलब्ध आहे की नाही, याची माहितीही मिळणार आहे. त्यामुळे दुकानात जाऊन चौकशी करण्याची गरज उरणार नाही.
ऑर्डर करा, QR Code घ्या आणि थेट दुकानातून दारू उचला
ग्राहकांनी ॲपवरून दारूची निवड करून ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर त्यांना एक QR Code दिला जाईल. हा QR Code संबंधित TASMAC दुकानात दाखवल्यानंतर ऑर्डर केलेली दारू ताब्यात घेता येईल. त्यामुळे दुकानांमधील लांबच लांब रांगा टाळण्यास मदत होणार असल्याचा दावा TASMAC अधिकाऱ्यांनी केला आहे.
एमआरपीपेक्षा जास्त पैसे आकारण्याला बसणार चाप
या ॲपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रत्येक ब्रँडची अधिकृत किंमत ॲपवर स्पष्टपणे दिसणार आहे. संपूर्ण व्यवहार ऑनलाइन होणार असल्याने ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे वसूल करण्याची शक्यता कमी होईल. अनेक ग्राहकांनी जादा दर आकारल्याच्या तक्रारी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी TASMAC ने एमआरपीपेक्षा अधिक पैसे आकारल्याच्या आरोपांवरून अनेक कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली होती. त्यानंतर किंमत निर्धारणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी हे डिजिटल पाऊल उचलण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, निश्चित किंमत आणि ऑनलाइन पेमेंटमुळे अशा तक्रारींमध्ये मोठी घट होईल.
इतर राज्यांमध्येही आधीपासून सुविधा
तमिळनाडूमध्ये ही सेवा 6 ऑगस्टपासून सुरू होत असली, तरी पश्चिम बंगालमध्ये eRetail पोर्टलद्वारे नोंदणीकृत ग्राहकांना ऑनलाइन दारू बुकिंगची सुविधा आधीपासून उपलब्ध आहे. ओडिशामध्ये देखील परवानाधारक दारू दुकाने आणि अधिकृत प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दारूची होम डिलिव्हरी करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता तमिळनाडूही डिजिटल दारू विक्रीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकणारे राज्य ठरणार आहे.