अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आला असून, या प्रकल्पासाठी म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, पार्किंगची आधुनिक सुविधा, भाविकांसाठी सोयी-सुविधांचा विस्तार तसेच मंदिर परिसराचा नियोजनबद्ध विकास केला जाणार आहे. या उपक्रमामुळे अक्कलकोट हे देशातील प्रमुख धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून अधिक विकसित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील देत पहिल्या टप्प्यासाठी तब्बल ५०० कोटी रूपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. प्रकल्पामुळे अक्कलकोटच्या धार्मिक आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, देशभरातून येणाऱ्या भाविकांना अधिक सुलभ आणि सुखद अनुभव मिळेल.
पंढरपूरप्रमाणे अक्कलकोटचा विकास आणि कॉरिडॉर व्हावा अशी आमची इच्छा आहे. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पाठपुरावा करून ७०० कोटी रूपयांपर्यंतचा विकास आराखडा देणार आहेत. यामध्ये अनेक मूलभूत सुविधा भाविकांना मिळणार आहेत, असे श्री स्वामी समर्थ मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे म्हणाले.
अक्कलकोट विकासासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या बैठकीत स्वामी समर्थ विकास आराखडा संदर्भात चर्चा झाली. त्यासाठी ५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातूनच अक्कलकोट नगर परिषदेला सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात अनेक विकास कामे असणार आहेत, असे अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी म्हणाले.