शिक्षकाचा संतापजनक प्रताप; तिसरीच्या विद्यार्थ्याचा हात चावला, गळा दाबल्याची घटना
शिक्षकाचा संतापजनक प्रताप; तिसरीच्या विद्यार्थ्याचा हात चावला, गळा दाबल्याची घटना
img
Nandini khandare More


अनेक वेळा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याच्या निरनिराळ्या  घटना घडल्या आहेत .  त्यामुळे या शिक्षकांना चाप लावण्यासाठी कडक कायदे करण्यात आले. परंतु तरीही देखील या घटना थांबत नसल्याने ही बाब चिंतेची बनत चालली आहे. दरम्यान आता एक संतापजनक घटना  आता समोर आली आहे. 

अहिल्यानगर शहराजवळील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या प्राचार्यांनी इयत्ता तिसरीतील आठ वर्षीय विद्यार्थ्याचा हात चावल्याचा आणि त्याचा गळा दाबून काही सेकंद हवेत उचलून धरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात प्राचार्य गौतम बहादुर्गे यांच्याविरुद्ध बाल न्याय (JJ Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ वर्षीय विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, शाळेत वर्गातील काही विद्यार्थ्यांमध्ये भांडण सुरू असताना संबंधित विद्यार्थ्याने ही बाब वर्गशिक्षिका ज्योती मॅडम यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी प्राचार्य गौतम बहादुर्गे यांना वर्गात बोलावले.

वर्गात आल्यानंतर प्राचार्यांनी भांडण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कान पिळले. त्यानंतर “भांडण कसे करतात ते दाखवतो,” असे म्हणत त्यांनी तक्रार करणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थ्याचा गळा पकडून हवेत उचलले. सुमारे वीस सेकंद एक ते वीस आकडे मोजत त्याला हवेत धरून ठेवले आणि खाली सोडल्यानंतर त्याच्या हाताचा चावा घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

लेखी माफी मागतो

घरी गेल्यानंतर मुलाच्या हातावरील जखम आणि त्याची अवस्था पाहून ही घटना पालकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पालकांनी प्राचार्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, “माझ्याकडून चुकून ही घटना घडली. मी लेखी माफी मागतो,” असे त्यांनी सांगितल्याचा दावाही पालकांनी केला आहे. मात्र, एका लहान मुलावर अशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक छळ करणे हा गंभीर प्रकार असून संबंधित प्राचार्यांवर कठोर कारवाई करून जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group