मुंबई पोलिसांची व्हॅन थांबवणाऱ्या तरुणीने अखेर उचललं ''हे'' मोठं पाऊल
मुंबई पोलिसांची व्हॅन थांबवणाऱ्या तरुणीने अखेर उचललं ''हे'' मोठं पाऊल
img
Nandini khandare More
NEET पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले होते. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला. 22 जुलै 2026 रोजी मुंबईतील दादर येथेही विद्यार्थी आणि तरुणांनी आंदोलन केले होते. याच आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या रिया अहिरने आता सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.

एकीकडे रियाच्या धाडसाचं कौतुक होत असताना दुसरीकडे तिला ऑनलाइन धमक्या, ट्रोलिंग आणि छळाचाही सामना करावा लागत आहे. सातत्याने होणाऱ्या या ट्रोलिंगविरोधात अखेर तिने महाराष्ट्र सायबर सेलकडे तक्रार केली आहे. रियाने शनिवारी सायबर सेलकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली असून याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यासाठी ती आज (सोमवार) सायबर सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.

सायबर सेलकडे दाखल केलेल्या तक्रारीबद्दल रिया म्हणाली, “आंदोलनातील माझे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून मला सतत अपमानास्पद टिप्पण्यांना आणि धमक्यांना सामोरं जावं लागत आहे. हे जरी सध्या ऑनलाइन असलं तरी त्याचं रुपांतर कुठल्याही मोठ्या गोष्टीत होऊ शकतं. माझ्या आईवडिलांवर याचा परिणाम होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. मी आंदोलकांच्या पाठिशी उभी राहिली तरी आता मला स्वत:साठीही उभं राहायला हवं. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मला खूप ट्रोल केलं जातंय. इतकंच नव्हे तर काहींनी मला अडल्ट कंटेंट क्रिएटर म्हणून खोटं दाखवलंय. ज्यांचे फॉलोअर्स खूप जास्त आहेत, अशा काही क्रिएटर्सनी माझा एक्स्क्लुझिव्ह पॉर्नोग्राफिक कंटेंट मिळवल्याचा खोटा आरोप करत माझे बिकिनीमधील एडिट केलेले फोटो अपलोड केले आहेत.”

“मी इन्स्टाग्रामवरील सबस्क्राइबर्सना माझे असे बोल्ड फोटो विकून लाखो रुपये कमावते, असा खोटा आरोप माझ्यावर केला जातोय. माझं कोणतंही बँक खातं माझ्या इन्स्टाग्रामशी जोडलेलं नाही. मी अशा कोणत्याही कंटेंटमधून एक रुपयाही कमावलेला नाही. भविष्यात असे अनेक खोटे आरोप होण्याची शक्यता असल्याने मी कायदेशीर मार्ग अवलंबला आहे. मला हे वेळीच थांबवायचं आहे. सतत छळ करणाऱ्यांना, धमकावणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे”, अशी प्रतिक्रिया रियाने दिली आहे. तर पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी रियाच्या तक्रारीची तपासणी सुरू असल्याची माहिती दिली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group