बोगद्याचे बांधकाम सुरू असताना भीषण दुर्घटना घडली असल्याची बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेत २० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. हा घटना सिक्कीम मध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , भूगर्भशास्त्रज्ञांसह २० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ५ जण अजूनही मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. २ जणांना वाचवण्यात आले आहे, त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे. मलब्याखाली अडकलेल्या ५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सिक्कीममध्ये बोगदा खचून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर बचावकार्याला वेग आला आहे. दुर्घटनास्थळावरून आतापर्यंत २० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये उत्तर बंगालमधील ११ कामगारांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या २० मृतदेहांपैकी १३ जणांची ओळख पटली आहे, असे सूत्रांनी सांगितले. मृतांपैकी नऊ जण जलपाईगुडी जिल्ह्यातील, तर दोघे अलीपूरद्वार जिल्ह्यातील आहेत. मृतांपैकी एक पंजाबचा, तर दुसरा सिक्कीमचा होता.बेपत्ता झालेल्यांपैकी एक अनिश मोहन (वय ४३) हे केरळचे रहिवासी असून भूगर्भशास्त्रज्ञ असल्याची माहिती मिळाली आहे.
सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तामांग गोले यांनी सांगितले की, नामचीमधील समरदुंग-झोलुंगे येथील एनएचपीसी स्टेज-६ जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात सोमवारी दुपारी झालेल्या स्फोटामुळे बोगदा कोसळला. त्यावेळी आत असलेल्या २७ लोकांपैकी दोघे जण बोगद्यातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. पण २५ जण मलब्याखाली दबले केले. त्यामधील २० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
एनएचपीसीने सांगितले की, खडकांच्या थरांमध्ये अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट झाल्यामुळे धूर आणि विषारी वायू तयार झाला. त्यामुळे ही दुर्घटना झाली. दुर्घटनेची माहिती मिळताच तात्काळ आपत्कालीन प्रतिसाद प्रोटोकॉल सक्रिय केले. मिथेनमुळे शोधकार्यात अडथळा येत आहे. दरम्यान, जलपाईगुडीच्या एसपी सुजाता कुमारी वीणापाणी यांनी सांगितले की, पीडितांच्या नातेवाईकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी पोलीस व्यवस्था करत आहेत. जलपाईगुडीचे एडीएम आणि डीएसपी (वाहतूक) घटनास्थळी पोहोचले आहेत.
सिक्कीमचे मुख्यमंत्री तामांग यांनी सांगितले की, या दुर्घटनेच्या तपासासाठी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले जाईल. नोव्हेंबर २०२३ मध्ये उत्तराखंडच्या सिल्कियारा येथे रस्ता बोगदा कोसळून ४१ कामगार १७ दिवस अडकून पडल्याच्या घटनेनंतरची ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक मृत कामगाराच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि प्रत्येक जखमी व्यक्तीला ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली.