घरगुती स्वयंपाकाच्या पद्धतीत लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणानंतर आता स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनातही इथेनॉलचा समावेश करण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरू आहे. यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत असून, एलपीजीला पर्याय म्हणून इथेनॉलवर चालणाऱ्या उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देण्याचाही प्रस्ताव चर्चेत आहे.
पेट्रोलमध्ये E20 मिक्स केल्यानंतर आता लवकरच जेवण बनवण्यासाठी लागणाऱ्या इंधनातही इथेनॉल वापरलं जाऊ शकतं, यामुळे तुमच्या किचनमधून एलपीजी गॅसही हद्दपार व्हायची शक्यता आहे. एकीकडे इथेनॉलवरून वाद सुरू असताना पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालय नवीन पॉलिसी तयार करत आहे, ज्याचा उद्देश इथेनॉलला घरात जेवण बनवण्यासाठी लागणारं इंधन म्हणून वापरणं आहे. सरकारकडून या पॉलिसीचा अभ्यास सुरू असून यासाठी सबसिडीही दिली जाऊ शकते. ईटीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. इंधन पुरवठादारांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटना या पॉलिसीबद्दल सध्या सरकारसोबत चर्चा करत आहेत.
एप्रिलपर्यंत तयार होणार पॉलिसी
स्वयंपाकघरातील इथेनॉल पॉलिसी सप्टेंबर महिन्यापर्यंत तयार होऊ शकते. एलपीजीवर अवलंबून राहणं कमी करण्यासाठी घरात जेवण बनवण्यासाठी इथेनॉलचा वापर करणं आणि यातून आयात कमी करणं, हा सरकारचा उद्देश आहे, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. सरकारला एप्रिलपर्यंत याबाबतचा रिपोर्ट मिळेल, यानंतर इथेनॉलचा वापर स्वयंपाकघरात करण्याबाबतचं परीक्षण सुरू केलं जाईल.
स्वयंपाकघरात इथेनॉल वापरण्याला चालना मिळावी म्हणून सरकार सबसिडी योजनाही लागू करू शकते. भारतामध्ये सध्या इथेनॉलची उपलब्धता जलद गतीने वाढत आहे. मे महिन्यातल्या केअरएज रेटिंग्सच्या रिपोर्टनुसार देसात इथेनॉलची वार्षिक उत्पादन क्षमता 20 अब्ज लीटर इतकी झाली आहे, सध्याच्या आर्थिक वर्षात यात अतिरिक्त 4 अब्ज लीटर वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार पेट्रोल E20 मध्ये प्रत्येक वर्षाला 11 अब्ज लीटर इथेनॉल वापरलं जातं, तर दारू उत्पादक कंपन्या, औषध कंपन्या आणि केमिकल उत्पादक कंपन्या मिळून 3-3.5 अब्ज लीटरचा वापर करतं. यामुळे 7 अब्ज लीटर इथेनॉल उपयोग न होताच राहतं. याचसोबत नेपाळ, बांगलादेश आणि इंडोनेशिया या शेजारच्या देशांमध्ये इथेनॉल निर्यात करण्याच्या शक्यताही तपासल्या जात आहेत. या देशांमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचं लक्ष्य 10 टक्के आहे.
इंधन कंपन्यांसोबतही या पॉलिसीवरून चर्चा सुरू आहे. या कंपन्यांनी इथेनॉलवर चालणाऱ्या चुलींसंबंधी रिसर्च सुरू केला आहे. तसंच या तंत्रज्ञानासंबंधी भागीदारीच्या चर्चाही पडताळल्या जात आहेत, असं सांगण्यात येत आहे.