सकाळी सकाळी मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा आणि रेल्वेचा भीषण अपघात झाला असून या व्हॅन मध्ये असलेल्या ३ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या व्हॅनला रेल्वेने धडक दिली आहे. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर आहेत. तसेच ८ जण किरकोळ जखमी आहेत. सदर घटना सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास बहारामपूर परिसरातील कर्णसुबर्णा रेल्वे फाटकाजवळ घडली. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी एक स्कूल व्हॅन रेल्वे रुळ ओलांडत असताना निमटिता-कटवा पॅसेंजर ट्रेनने तिला जोरदार धडक दिल्याची माहिती आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कर्णसुबर्णा रेल्वे फाटक त्या वेळी खुले होते. त्यामुळे शाळेची व्हॅन तसेच एक सायकलस्वार रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी वेगाने येणाऱ्या पॅसेंजर ट्रेनने व्हॅनला धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की व्हॅनचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून बहारामपूर येथील मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रेल्वे प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हावड्याकडे जाणारी नवद्वीप एक्सप्रेस गेल्यानंतरही गोबिंदपूर रेल्वे फाटक खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे वाहनचालकांनी रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि हा भीषण अपघात घडला. दरम्यान, अपघाताची गंभीर दखल घेत पूर्व रेल्वे प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली आहे. दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी विशेष पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.