पुन्हा एकदा इराण आणि अमेरिका युद्ध पेटले असून इराण -अमेरिका संबंध ताणले गेल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिका आणि इस्त्रायल या दोन देशांकडून इराणवर हल्ले केले जात आहे. याला इराणकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे. असे असताना आता होर्मुझ सामुद्रधुनीच्या दक्षिण सागरी मार्गावरून जात असताना ‘मोम्बासा’ आणि ‘अल बहिया’ या दोन राष्ट्रीय तेलवाहू जहाजांवर इराणच्या दोन क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.
इराणने केलेल्या या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे दोन्ही जहाजांना आग लागली, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. मात्र, आग आता नियंत्रणात आणण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन आणि प्रदेशाच्या सुरक्षा व स्थिरतेसाठी मोठा धोका म्हटले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, या वाढत्या तणावाला प्रत्युत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार संयुक्त अरब अमिराती (UAE) राखून ठेवते. आपले सार्वभौमत्व, सुरक्षा, स्थिरता आणि राष्ट्रीय हितसंबंध जपण्यासाठी, ते आपला प्रदेश, नागरिक आणि रहिवाशांचे संरक्षण करण्याकरिता सर्व आवश्यक उपाययोजना करेल.
तसेच मंत्रालयाने स्पष्ट केले की, ते कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आणि सतर्क आहे. देशाची सुरक्षा धोक्यात आणण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल.
संरक्षण मंत्रालयाने जनतेला केवळ अधिकृत स्रोतांकडूनच माहिती मिळवण्याचे आवाहन केले आहे. मंत्रालयाने लोकांना सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवर अफवा आणि पडताळणी न केलेली माहिती पसरवण्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) परराष्ट्र मंत्रालयाने, ओमानच्या प्रादेशिक सागरी हद्दीत असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये, इराणने त्यांच्या ‘मोम्बासा’ आणि ‘अल बहिया’ या राष्ट्रीय तेलवाहू जहाजांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यांमध्ये एका भारतीय नागरिकाच्या मृत्यूविषयी मंत्रालयाने भारत सरकार आणि भारतीय जनतेप्रती तीव्र शोक व्यक्त केला.