मराठी मनोरंजन विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे. सोशल मीडियावर दोघांनी एक पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली.
खूप विचार केल्यानंतर एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने घटस्फोट घेत आहोत, असं या पोस्टमध्ये दोघांनी म्हटलंय. त्याचसोबत यापुढेही मुलगी जिजा हिच्यासाठी नेहमीच एकत्र राहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. डिसेंबर 2011 मध्ये आदिनाथ आणि उर्मिला यांनी लग्न केलं होतं.
आदिनाथ-उर्मिलाची पोस्ट-
‘खूप विचार केल्यानंतर आम्ही, आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचं संगोपन करत आहोत. आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील,’ असं या पोस्टमध्ये म्हटलंय.
यात त्यांनी पुढे स्पष्ट केलंय, ‘गेल्या काही वर्षांत मीडिया आणि तुम्हा सगळ्यांनी आम्हाला जे भरभरून प्रेम आणि साथ दिली आहे, त्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावरही तुमचं हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असंच राहतील, अशी आम्हाला आशा आहे. म्हणूनच आमच्या या खासगी प्रवासात मीडिया आणि जनतेनं आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा, अशी आमची नम्र विनंती आहे. या विषयावर आमचं हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही. तुमचं प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल मनापासून धन्यवाद.’