सरकारनं अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घोषणा केलीय. राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांसाठी प्रत्येकी २ हजार रुपये भाऊबीजची भेट म्हणून दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांच्या पर्यवेक्षिका पदावर पदोन्नतीच्या वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णयानंतर सरकारनं घेतलेल्या या निर्यणामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. राज्यात 1,08,627 अंगणवाडी सेविका आणि 1,05,470 अंगणवाडी मदतनीस आहेत. त्यामुळे, दोन्हीची एकूण पदसंख्या 2,14,097 एवढी कार्यरत आहे. या सर्व कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. त्यासाठी 42 कोटी 81 लाख 94 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.