गेल्या काही दिवसांत विमान अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही वेळा तांत्रिक बिघाड तर कधी वैमानिकाची चूक अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र आता एक थरारक अपघाताची बातमी समोर आली आहे. या घटनेत विमानावर वीज पडल्याची घटना घडलीये
पटना ते लखनऊ असा प्रवास करणाऱ्या इंडिगोच्या विमानावर वीज पडल्याची घटना घडलीये. लखनऊजवळ विमान सुमारे 17 हजार फूट उंचीवर असताना ही घटना घडली. त्यावेळी परिसरात हवामान खराब होते. विमानावर वीज कोसळल्यानंतर काही वेळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
मात्र सुदैवाने या घटनेचा विमानाच्या उड्डाणावर मोठा परिणाम झाला नाही. पायलटने विमानावर नियंत्रण कायम ठेवत ते लखनऊच्या चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे लँड केलं. या विमानात सुमारे 104 प्रवासी होते. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाल्याचं समोर आलेलं नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे. पंरतु विमानाच्या पुढच्या भागाचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे.
वेळेआधीच विमान लखनऊत दाखल इंडिगोचं 6E925 हे फ्लाइट पटनामधून दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी लखनऊसाठी निघालं होतं. हे विमान संध्याकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी लखनऊला पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र खराब हवामानामुळे विमानाने त्यापूर्वीच लखनऊ विमानतळावर लँडिंग केलं. सुमारे 4 वाजून 5 मिनिटांनी विमान लखनऊ विमानतळावर उतरलं. अहमदाबादला जाणारं विमानही रखडलं लखनऊला पोहोचल्यानंतर याच विमानाला इंडिगोच्या 6E6968 या फ्लाइटने अहमदाबादला जायचं होतं. हे फ्लाइट संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी लखनऊहून रवाना होणार होतं. मात्र विमानाची तपासणी केल्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड असल्याचं समोर आलं. त्यामुळे विमान पुढील प्रवासासाठी वापरण्यात आलं नाही आणि ते लखनऊ विमानतळावरच थांबवण्यात आले.
प्रवाशांना जास्त त्रास होऊ नये यासाठी इंडिगोकडून दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानातून संध्याकाळी सुमारे 6 वाजून 22 मिनिटांनी अहमदाबादसाठी रवाना करण्यात आले. याआधीही इंडिगोच्या विमानावर कोसळली होती वीज इंडिगोच्या विमानावर वीज कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी 19 जून रोजीही अशीच घटना घडली होती. जून महिन्यात तुफान सुरू असताना कोलकाता विमानतळावर उभ्या असलेल्या इंडिगोच्या विमानावर वीज कोसळली होती. हे विमान अगरतळासाठी रवाना होणार होते.
वीज कोसळल्यानंतर विमानाच्या पॉवर सिस्टमवर मोठा परिणाम झाला होता. त्यानंतर विमानातील 141 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्सना विमानातून खाली उतरवण्यात आलं. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून नंतर दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली. या दुसऱ्या विमानातून सर्व प्रवाशांना अगरतळाला पाठवण्यात आलं होतं.