एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाचा मृतदेह अत्यंत गूढ पद्धतीने एका विहिरीत आढळला आहे. या घटनेनं एकच खळबळ निर्माण झाली आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव घाट येथे सोमवारी सकाळी एक धक्कादायक आणि संशयास्पद घटना उघडकीस आली आहे. विहिरीच्या काठावर दुचाकी उभी करून विहिरीच्या पाण्यात एका अंदाजे २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, तरुणाचा मृत्यू घातपातातून झाला की त्याने आत्महत्या केली, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. अंभोरा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मयताची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
पिंपळगाव घाट शिवारातील एका शेतातील विहिरीच्या बाजूला एम.एच. १६ ए.डब्ल्यू. ७४१४ या क्रमांकाची दुचाकी बऱ्याच वेळेपासून संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे स्थानिक शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. त्यांनी जवळ जाऊन विहिरीत डोकावून पाहिले असता, पाण्यात एका तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसला. शेतकऱ्याने तात्काळ या घटनेची माहिती गावातील इतर लोकांना दिली आणि अंभोरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह काढला बाहेर घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस हवालदार भरत माने आणि अमोल शिरसाठ यांना तात्काळ घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांच्या सहकार्याने दोरीच्या साहाय्याने विहिरीतून तरुणाचा मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढला. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला.
ओळख पटवण्याचे पोलिसांचे प्रयत्न मयत तरुणाचे वय अंदाजे २५ वर्षे असून, विहिरीकाठी सापडलेली दुचाकी अहमदनगर (अहिल्यानगर - MH 16) पासिंगची आहे. या दुचाकीच्या नोंदणी क्रमांकावरून मालकाचा आणि संबंधित तरुणाचा पत्ता शोधण्याचे काम सायबर व वाहतूक शाखेच्या मदतीने सुरू आहे. तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली की त्याला कोणी ढकलून दिले, याचा उलगडा शवविच्छेदन अहवाल आणि ओळख पटल्यानंतरच होणार आहे. पोलिसांनी परिसरातील नागरिकांना या वर्णनाचा किंवा दुचाकीचा चालक बेपत्ता असल्यास अंभोरा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.