पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी जमली असताना चोरट्यांनी मात्र संधी साधल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी चक्क १० हजार रुपयांचे महागडे तिकीट खरेदी करून कॉन्सर्टमध्ये प्रवेश केला. त्यानंतर गर्दीचा फायदा घेत तब्बल ४.३ लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याचा आरोप आहे.
अहमदाबादमध्ये आयोजित दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दोन व्यक्तींनी तब्बल ११ महागडे मोबाईल फोन चोरल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची किंमत ४.३० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
५ हजारांचे गोल्ड पास खरेदी करून कॉन्सर्टमध्ये प्रवेश ही घटना शनिवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दिलजीत दोसांझच्या 'ऑरा इंडिया टूर' कॉन्सर्टदरम्यान घडली. आरोपींनी प्रत्येकी ५ हजार रुपये किमतीचे गोल्ड पास खरेदी केले होते. कॉन्सर्टमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी गर्दीचा फायदा घेत प्रेक्षकांचे मोबाईल फोन चोरले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची ओळख ३६ वर्षीय मोहम्मद असद मोहम्मद गुलझार आणि २४ वर्षीय अश्रफ हुसेन नूर हुसेन इद्रिसी अशी झाली आहे. हे दोघेही दिल्लीचे रहिवासी आहेत. त्यांनी गर्दीत सहज मिसळता यावे यासाठी डोक्यावर पागडी घातली होती.
कॉन्सर्ट संपताच पोलिसांनी केली अटक दिल्लीतील काही व्यक्ती कॉन्सर्टमध्ये मोबाईल चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याची गुप्त माहिती अहमदाबाद पोलिसांच्या झोन-२ अंतर्गत येणाऱ्या लोकल क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या प्रवेशद्वारांवर आणि परिसरात पाळत ठेवली. कॉन्सर्ट संपल्यानंतर आरोपी चोरी केलेले मोबाईल घेऊन स्टेडियममधून बाहेर पडण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांच्याकडून ॲपल आणि सॅमसंगसारख्या महागड्या ब्रँडचे ११ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या सर्व फोनची अंदाजित किंमत ४.३० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
आतापर्यंत ८ जणांच्या तक्रारी या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांनी त्यांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवल्या आहेत. नवव्या मोबाईलच्या मालकाचीही ओळख पटली आहे. तर उर्वरित दोन मोबाईलच्या मालकांचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी मोटेरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का, याचा पोलीस तपास करत आहेत.