राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आणखी एक भीषण दुर्घटना समोर आली आहे. ट्रकला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संध्याकाळी मित्रांसोबत बाहेर पडलेल्या या तरुणांचा प्रवास अखेरचा ठरला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. बोईसर-नवापूर रोडवरील पाम टेंभी गावाच्या हद्दीत भरधाव दुचाकीने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोहित शर्मा, रवी गुप्ता आणि नयन महातो अशी अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिन्ही विद्यार्थी बोईसरमधील गणेश नगर परिसरात राहत असल्याची माहिती आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही विद्यार्थी संध्याकाळच्या सुमारास दुचाकीवरून नांदगाव-आलेवाडी बीचच्या दिशेने जात होते. याचदरम्यान बोईसर-नवापूर रोडवरील पाम टेंभी गावाच्या हद्दीत त्यांच्या भरधाव दुचाकी पुढे धावणाऱ्या ट्रकला मागे धडकली.
धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. तीन तरुण विद्यार्थ्यांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गणेशनगर परिसरात शोककळा पसरली आहे.एकाच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तीन तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ऐन उमेदीच्या वयात तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या अपघाताची नोंद सातपाटी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघात नेमका कशामुळे घडला, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.