नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- दारू पिताना झालेल्या वादातून शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणातील फरार आरोपीला नाशिकरोड युनिटच्या गुन्हे शाखेने चेतनानगर परिसरातील बांधकाम साइटवरून अटक केली. मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
सतीश श्रावण रौंदळ (वय ३८, रा. शिवाजी चौक, सिडको) असे मृत तरुणाचे नाव आहे. ८ नोव्हेंबर रोजी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी झालेल्या सतीशचा १५ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात ९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिकरोड युनिटचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाने तपास सुरू केला.
घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना लेखानगर परिसरात एक संशयित दिसून आला. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने पोलिसांनी लेखानगर ते पाथर्डी फाटा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने शोध सुरू ठेवला. तपासाची व्याप्ती वाढवत वाडीवऱ्हे परिसरापर्यंतही शोधमोहीम राबवण्यात आली. दरम्यान, संशयित कमोदनगर परिसरातून पायी जात असल्याचे 150 सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याआधारे निष्पन्न झाले. त्याच्या हालचालींचा माग काढताना तो बांधकाम मजूर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी कमोदनगर, बापू बंगला, चार्वाक चौक आणि चेतनानगर परिसरातील बांधकाम साइटवर मजुरांना संशयिताचे छायाचित्र दाखवून चौकशी केली. अखेर सोनवणे मळा, चेतनानगर येथील बांधकाम साइटवर तो काम करत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी विकेश ऊर्फ विकी रामलाल कोल (वय २९, मूळ रा. टिकर, जिल्हा सतना, मध्य प्रदेश, सध्या सोनवणे मळा, चेतनानगर, नाशिक) याला अटक केली. चौकशीत घटनेच्या दिवशी सतीश रौंदळ आणि आरोपी दोघेही दारू पीत असताना सतीश यांनी शिवीगाळ केल्याचा राग आल्याने आरोपीने त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची माहिती समोर आली. अटकेनंतर आरोपीला पुढील तपासासाठी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एसीपी संदीप मिटके यांची माहिती
या कारवाईची माहिती सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. या गुन्ह्याचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक काजल मोरे करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, प्रेमचंद गांगुर्डे, पोलीस हवालदार मंगेश जगझाप, अविनाश देवरे, राहुल जगझाप, दत्तात्रय चकोर, पोलीस शिपाई भरत राऊत, समाधान जाधव, संदीप भुरे, राकेश राऊत, कुणाल घोरपडे आणि केतन सोनवणे यांनी ही कारवाई केली.