खळबळजनक !  पाण्याची टाकी साफ करायला उतरलेल्या ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू; एकाची प्रकृती गंभीर
खळबळजनक ! पाण्याची टाकी साफ करायला उतरलेल्या ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू; एकाची प्रकृती गंभीर
img
Nandini khandare More
पाण्याच्या टाकीची साफसफाई करण्यासाठी टाकीत उतरलेल्या चार विद्यार्थ्यांचा विषारी वायूमुळे मृत्यू झाला असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील चैतन्य विहार परिसरातील महर्षी पाणिनी संस्कृत गुरुकुलममध्ये मंगळवारी रात्री ही  दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे गुरुकुल परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुकुल परिसरातील सुमारे १२ फूट खोल सबमर्सिबल पाण्याच्या टाकीतून दुर्गंधी येत होती. त्यामुळे टाकीची साफसफाई करण्यासाठी एक विद्यार्थी आत उतरला. मात्र, टाकीत असलेल्या विषारी वायूमुळे तो काही क्षणांतच बेशुद्ध झाला. बाहेर असलेल्या विद्यार्थ्यांनी त्याला आवाज दिला, मात्र कोणताही आवाज आला नाही. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी एकामागोमाग चार विद्यार्थी टाकीत उतरले. मात्र, विषारी वायूमुळे तेही टाकीतच बेशुद्ध पडले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांना टाकीतून बाहेर काढण्यात आले आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर चार विद्यार्थ्यांना मृत घोषित केले. मृत विद्यार्थ्यांमध्ये मध्य प्रदेशातील जबलपूर येथील २० वर्षीय मनु कटारे, १८ वर्षीय देवांश, मेरठ येथील १७ वर्षीय विशु आणि प्रयागराज येथील १७ वर्षीय आर्यन पांडे यांचा समावेश आहे. तर १८ वर्षीय रुद्राक्षची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group