मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजनीमान्याची मागणी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांविरोधात विरोधक आक्रमक झाले असून आता गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर आणि मध्य दिल्ली परिसरात आंदोलनांना वेग आला आहे. याचदरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. ज्ञानेश कुमार यांना यापूर्वीच Z-प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र, राजधानीत सुरू असलेली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्थानिक पोलिसांनाही त्यांच्या स्तरावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवी दिल्ली जिल्ह्यात सध्या विविध ठिकाणी आंदोलनांचे वातावरण असल्याने सुरक्षा यंत्रणांना परस्पर समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर आणि मध्य दिल्ली परिसरात आंदोलनांना वेग आला आहे. या आंदोलनांदरम्यान पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून काही आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आले आहे.