यंदा राज्यात मेघराजाने पाठ फिरवल्याने राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. बळीराजा हतबल झाला असून आता राज्यातील स्थिती ही चिंताजनक असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. गरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांचे दैवत असलेले श्री विठ्ठल-रुक्मिणी दुष्काळाच्या भीषण टंचाईच्या काळात आपल्या भक्तांच्या मदतीला धावून आले आहे. दुष्काळ निवारणासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने 'मुख्यमंत्री सहायता निधी'स तब्बल २ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या मदतीचा धनादेश लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. काल पार पडलेल्या मंदिर समितीच्या बैठकीत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कार्तिकी यात्रेला २४ तास दर्शन सुरूणार या वेळी बोलताना गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विठ्ठल भक्तांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. आगामी कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने येत्या १४ नोव्हेंबरपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू केले जाणार आहे. यामुळे कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन घेता येणार आहे.